दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी लवकरच 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासह रणबीर कपूर आणि यश प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यामुळे चित्रपटाची उत्कंठा प्रचंड वाढलेली आहे. पण यादरम्यान साई पल्लवीचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तिच्या कॉलेजच्या दिवसांमधील आहे. या व्हिडीओत साई पल्लवी 'तीस मार खान' चित्रपटातील 'शीला की जवानी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.
व्हायरल व्हिडीओत साई पल्लवी स्टेजवर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. यावेळी ती कतरिनासारख्या हुबेहूब स्टेप्स करताना दिसत आहे. हे गाणं परफॉर्म करत असताना काही वेळाने तिचे मित्रही स्जेटवर दिसत आहेत. एक्सवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, 'filmophile' अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच कॉलेज फेस्टिव्हलदरम्यान हा डान्स करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
#SaiPallavi in
— Prabu (@prabumuthiyalu) April 16, 2024
Sheela ki Jawani Song at her College Fest pic.twitter.com/0bA6zIb0Rr
साई पल्लवीचा डान्स व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारी महिन्यात साई पल्लवीची बहीण पूजा कन्ननचा साखरपुडा झाला होता. यावेळी साई पल्लवीने साडीमध्ये कुटुंबीयांसह डान्स केला होता. हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
तसंच याआधी साई पल्लवीचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोच्या माध्यमातून तिने दिग्दर्शक राजकुमार पेरियास्वामी यांच्याशी लग्न केल्याचा दावा केला होता. अनेक सोशल मीडिया पेज आणि फॅन्स क्लबवर दोघांचा गळ्यात हार घातल्याचा फोटो शेअर करण्यात आला होता. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी दोघांचे फोटो पुन्हा शेअर करत साई पल्लवी आणि पेरियास्वामी यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
यानंतर साई पल्लवीने एक्सवर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं होतं. हा फोटो आगामी चित्रपट SK 21 च्या पूजेदरम्यान काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. “प्रामाणिकपणे, मला अफवांची पर्वा नाही पण जेव्हा त्यात कुटुंबातील मित्रांचा समावेश असतो तेव्हा मला बोलावं लागतं. माझ्या चित्रपटाच्या पूजा समारंभातील फोटो जाणूनबुजून क्रॉप केला आणि घृणास्पद हेतूने प्रसारित केला. जेव्हा माझ्याकडे कामासंबधी आनंद साजरा करणाऱ्या गोष्टी असतात तेव्हा बेरोजगारांकडे स्पष्टीकरण देणं निराशाजनक आहे. अशाप्रकारे अस्वस्थता निर्माण करणे निव्वळ नीच आहे!”, असं साई पल्लवीने म्हटलं होतं.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटामध्ये साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.