Sanjay Dutt Net Worth : बॉलिवूड (Bollywood)... भारतीय सिनेजगतात आजवर अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. दशकानुदशकं हे चेहरे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत राहिले आणि अर्थात यापुढंसुद्धा राहतील यात वाद नाही. अशाच चेहऱ्यांपैकी एक म्हणजे, अभिनेता संजय दत्त. जवळपास 44 वर्षे या सिनेसृष्टीमध्ये सक्रिय असणाऱ्या या कलाकाराला आई- वडिलांकडूनच या कलेचं बाळकडू मिळालं. त्याच्या वाट्याला यशापयाचे अनेक टप्पे आले, आव्हानंही आली. पण, परिस्थिती स्वीकारत त्यानं 'रॉकी', 'साजन', 'वास्तव', 'काँटे', 'खलनायक', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटांतून अशी काही कमाल केली की त्याच्या भूमिका आजही तितक्याच लक्ष वेधतात.
फक्त सिनेजगतच नव्हे, तर संजय दत्तनं विविध व्यवसायांमध्येही उडी घेतली असून, मुंबई आणि दुबई इथंही त्याची घरं, बंगले असल्याचं म्हटलं जातं. मुंबईच्या घराविषयी सांगावं तर संजूबाबा इथं पाली हिल नावाच्या उच्चभ्रू वस्तीत एका घराचा मालक असून, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, फरहान अख्तर हे त्याचे शेजारी. कधीकाळी सुनील दत्त आणि नर्गिस यांचा 'अजंठा' बंगला असणाऱ्याच भूखंडावर संजय दत्तनं 'इम्पेरिअल हाईट्स' ही इमारत उभारली. सूत्रांच्या माहितीनुसार या इमारतीत संजूबाबा आणि त्याच्या बहिणीचं घर असून अभिनेत्याच्या घराची किंमत आहे 40 कोटी रुपये.
2020 पूर्वीच संजय दत्तची दुबईमध्ये ये-जा सुरू झाली आणि त्यानं तिथं पत्नी मान्यतासमवेत व्यवसाय सुरू केला. किंबहुना बहुतांश काळ तो आणि त्याचं कुटुंब तिथंच असतात. तिथंच त्याच्या मुलांचं शिक्षणही सुरू असून संजुबाबा दुबईमध्ये आनंदी आयुष्य जगतो.
एकदोन नव्हे तब्बर 295 कोटींचा मालक असणारा हा अभिनेता फक्त सिनेसृष्टीतूनच नव्हे तर व्यवसाय क्षेत्रातूनही तगडा पैसा कमवतो असं म्हणतात. B-Love Kandy या फ्रँचायझी क्रिकेट संघाच्या मालकीचा अर्धा भाग संजय दत्तकडे आहे. GQ च्या माहितीनुसार त्यानं स्नीकर्स आणि स्ट्रीटवेअर रिटेलर स्टार्टअप DawnTown मध्ये 4 कोटींची गुंतवणूक केली आहे. याशिविय सायबर मिडिया इंडियाचे शेअर्सही त्याच्याकडे असल्याचं सांगण्यात येतं. हल्लीच त्यानं Cartel & Bros या मद्यउत्पादकांशी हातमिळवणी करत स्वत:चा Scotch whisky brand, The Glenwalk लाँच केला.
Sanjay Dutt Productions आणि Three Dimension Motion Pictures या निर्मितीसंस्थांचाही तो मालक आहे. मात्र इथं त्याला फारसं यश मिळवता आलेलं नाही. 2024 च्या डिसेंबर महिन्यात अभिनेत्यानं Dutts’ Franktea नावाचं हॉटेल दुबईत सुरू करत या क्षेत्रातही उडी घेतली.
व्यवसाय, सिनेक्षेत्र, भारत आणि दुबई असा समतोल साधणारा संजुबाबा कारप्रेमी असून त्याच्याकडे एकाहून एक सरस कारचं कलेक्शन आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस घोस्ट (Rs 6.95–7.95 कोटी), लँड रोव्हर, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, ऑडी आर8, फरारी 599 जीटीबी, ऑडी क्यू7 अशा कार असून, हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय आणि डुकाटी मल्टीस्टारडा अशा अफलातून मोटरसायकलसुद्धा आहेत. थोडक्यात काय... तर संजय दत्तच्याच भाषेत सांगावं तर, 'बोले तो... एकदम सेट!'