Marathi News> मनोरंजन
Advertisement

माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी संजीव कुमार घरी आले, सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा; 'वडिलांनी दार...'

Sachin Pilgaonkar On Sanjeev Kumar: सचिन यांनी एका मुलाखतीमध्ये नेमकं काय घडलं याबद्दलची एका खास आठवण सांगितली आहे. सचिन काय म्हणालेत जाणून घ्या...

माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी संजीव कुमार घरी आले, सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा; 'वडिलांनी दार...'

Sachin Pilgaonkar On Sanjeev Kumar: मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांनी मनोरंजनसृष्टीमध्ये पाच दशकांहून अधिक काळ काम केलं आहे. बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे सचिन हे नुकतेच 'नवरा माझा नवसाचा 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. अधूनमधून ते वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देत असतात. कधी युट्यूब चॅनेलला तर कधी पॉडकास्टवर सचिन मुलाखतींमध्ये वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. अर्थात त्यांनी केलेल्या विधानांवरुन अनेकदा लोक त्यांनी थट्टा आणि ट्रोलिंग करताना दिसतात. मात्र सचिन ते त्यांच्या विधानांवर ठाम असतात. बऱ्याचदा ते पूर्वी कधीही न ऐकलेले किस्सेही मुलाखतीत सहज सांगून जातात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी नावाजलेल्या अभिनेते संजीव कुमार यांच्यासंदर्भातील एक आठवण सांगितली आहे. 

त्या दिवशी संजीव कुमार माझ्या घरी आले

सचिन पिळगावर यांनी संजीव कुमार त्यांच्या घरी आले होते असं सांगितलं. अचानक संजीव कुमार घरी आले तेव्हा काय घडलं याची सविस्तर माहिती आरजे सोनालीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिली आहे. सचिन यांनी, "संजीव कुमार (हरीभाई) माझ्या घरी आले.  त्यादिवशी 'हा माझा मार्ग एकला'  हा माझा चित्रपट त्यांनी बघितला होता. चित्रपट बघितल्यानंतर ते बाहेर आले, संध्याकाळचे  7 वाजले असतील. त्यांनी विशु राजाला विचारलं की, 'सचिन कुठं राहतो तुला माहीत आहे का?' विशु राजाने, 'हो माहीत आहे ' म्हटल्यावर  'मला घेऊन चला ' असे हरिभाई म्हणाले," असा दावा केला आहे.

मध्ये थांबले आणि त्यांनी एक ऑटोग्राफ बुक विकत घेतलं

"गाडीत बसल्यानंतर जाताना सांताक्रूजच्या स्टेशनरी शॉपजवळ हरिभाईंनी गाडी थांबवली. एक ऑटोग्राफ बुक आणि पेन विकत घेतलं. ते घरी आले, बेल मारली, माझ्या वडिलांनी दार उघडलं. समोर संजीव कुमार उभे आहेत. हरिभाईंना समोर बघून वडिलांनी 'अरे! हरिभाई' म्हणत आत घेतलं, त्यांनी 'सचिन आहे का? त्याला बोलवा', असं म्हटल्यानंतर मी आलो. ते म्हणाले की, "मी आताच तुझा 'हा माझा मार्ग एकला' चित्रपट बघून आलो. मी आयुष्यात कधीच कोणाचा ऑटोग्राफ घेतला नाही. माझ्या आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ तुझा हवाय." मी त्यांना ऑटोग्राफ दिला आणि लिहिलं 'My Dear हरिभाई With Love सचिन," असं सचिन म्हणाले. 

बालकलाकार म्हणून सचिन यांनी 65 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

Read More