Shahid Kapoor Kareena Viral Video: आयफा 2025 च्या पत्रकार परिषदेदरम्यान शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) एकत्र आले असता त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. नातं तुटल्यानंतर एकमेकांशी कित्येक काळ अबोला धरणाऱे शाहीद कपूर आणि करिना कपूर यांनी यावेळी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांच्यातील हे हलके फुलके क्षण पाहिल्यानंतर काहीजण आश्चर्यचकित झाले तर काहींना आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर तर कित्येकजण व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत होते.
शाहीद कपूर आणि करिना कपूर अचानक एकमेकांशी इतके मैत्रीपूर्ण वागू लागल्याने अनेकांना आश्चर्य वाटत असताना स्वत: शाहीद कपूर मात्र अगदी सामान्यपणे या क्षणाकडे पाहत आहे. आयफा डिजिटल अवॉर्ड्सदरम्यान रेड कार्पेटवर शाहीद कपूरने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने करिनासोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला. "आमच्यासाठी हे नवीन नाही. आम्ही इथे, तिथे भेटत असतो. आमच्यासाठी हे फार सामान्य आहे. जर लोकांना हे पाहून बरं वाटत असेल, तर चांगली बाब आहे".
एकेकाळी शाहीद कपूर आणि करिना कपूर प्रेमसंबंधात होते. बॉलिवूडमध्ये त्यांच्या नात्याची चांगलीच चर्चा होती. 2000 मध्ये दोघेही बॉलिवूडमध्ये नवखे होते आणि मोठे स्टार होण्यासाठी धडपडत होते. दोघांनी फिदा, चुप चुप के आणि जब वी मेट अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. जब वी मेट चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.
नंतर, करीनाने सैफ अली खानशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत, तर शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले, जिच्यापासून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
आयफा पुरस्कार सोहळ्याचं यावेळी जयपूर, राजस्थान येथे आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी, दोघे स्टार परफॉर्म करणार आहेत. शाहीद त्याच्या लोकप्रिय हिट गाण्यांवर नृत्य करेल, तर करीना तिचे आजोबा, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांना श्रद्धांजली वाहणार आहे.