90 च्या दशकात, एका अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला जिने अगदी कमी वयातच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. एवढंच नव्हे तर त्या काळातील टॉप अभिनेत्री बनली. या अभिनेत्रीची प्रतिभा इतकी होती की तिला केवळ देशातच नव्हे तर जगभरात विशेष ओळख मिळाली. पण तिच्यासोबत झालेल्या एका घटनेने सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे. कमी काळात तिने प्रेक्षकांना मोहिनी घातली पण आजही तिच्या मृत्यू गूढ कायम आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हादरला.
इतक्या लहान वयात दिव्याने 20 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तिने शाहरुख खानसोबत 'दीवाना' (1992) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आजही शाहरुख खान अनेकदा तिची आठवण काढतो आणि एवढंच नव्हे तर तो तिच्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करतो. एका जुन्या मुलाखतीत दिव्या भारतीची आठवण काढत शाहरुख म्हणाला होता की, ती एक अतिशय हुशार अभिनेत्री होती. त्याने सांगितले की, तो स्वतः खूप गंभीर व्यक्ती होता, तर दिव्या पूर्णपणे मजेदार आणि उत्साही मुलगी होती.
दोघेही मुंबईतील सी रॉक हॉटेलमधून बाहेर पडत असतानाचा एक खास क्षण शाहरुखने आठवला. मग दिव्याने त्याच्याकडे पाहिले आणि असे काही बोलली जे शाहरुखच्या मनाला भिडले आणि कायमचे त्याच्यासोबत राहिले. शाहरुख म्हणाला, 'आम्ही सी रॉक हॉटेलमधून निघत होतो, तेव्हा दिव्याने मला पाहिले आणि म्हणाली, 'तू फक्त एक अभिनेता नाहीस, तू एक इंस्टीट्युशन (संस्था) आहेस'. ती गोष्ट मला खूप भावली. शाहरुखने पुढे सांगितले की, जेव्हा त्याला दिव्याच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा तो दिल्लीत होता.
तो म्हणाला, 'मी दिल्लीत झोपलो होतो आणि त्यावेळी 'ऐसी दिवानगी' हे गाणे वाजत होते.' मला वाटलं होतं की मी स्टार झालो आहे, पण सकाळी उठल्यावर मला कळलं की दिव्याचा मृत्यू झाला आहे. दिव्याच्या मृत्यूची बातमी ऐकून तो आतून तुटल्याचे शाहरुखने सांगितले. त्याने सांगितले की दिव्याचा आणखी एक चित्रपट त्याच्यासोबत करायचा होता, पण तो होऊ शकला नाही. एका इमारतीच्या खिडकीतून पडून दिव्याचा अपघातात मृत्यू झाला. शाहरुख म्हणाला की, आजही त्याला दिव्याची आठवण येते.
दिव्या भारतीने तिच्या करिअरची सुरुवात 'नीला पेन' (१९९०) या तमिळ चित्रपटातून केली आणि नंतर 'बॉब्बिली राजा' (१९९०) या चित्रपटातून ती तेलुगू चित्रपटसृष्टीत लोकप्रिय झाली. त्यांनी 'राउडी अल्लुडू' (१९९१) मध्ये चिरंजीवी आणि 'असेंब्ली राउडी' (१९९१) मध्ये मोहन बाबू सारख्या स्टार्ससोबत काम केले. तिने 'विश्वात्मा' (1991) द्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर 'बलवान' आणि 'शोला और शबनम' सारख्या हिट चित्रपटांमध्ये दिसली. १९९२ मध्ये तिचे 12 चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात 'दीवाना' आणि 'दिल आशना है' यांचा समावेश होता.