Shark Tank India: शार्क टँक इंडियाच्या चौथा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिझनमध्ये अशी काही घटना घडलीय जी शार्क टँकच्या इतिहासात कधीही घडली नव्हती. अशी वेळ आली की शोच्या निर्मात्यांना मध्यस्थी करावी लागली. शार्क टँक इंडियाच्या चौथ्या सीझनमध्ये बर्गर बे (Burger Bae) स्टार्टअपचा सह-संस्थापक सेटवर पिच देत होता. यावेळी त्याला त्याची मैत्रीण जान्हवी सिकारियाला प्रपोज करायचे होते. पण निर्मात्यांनी त्यांला तसे करण्यापासून रोखले. काय घडला प्रसंग? जाणून घेऊया.
बर्गर बे ही कंपनी इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरील फॅशन ट्रेंडिंगनुसार कपडे बनवते. विविध इन्फ्लुएंसर व्हायरलिटीमध्ये खूप मदत करतात, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक ग्राहकांना त्यांची उत्पादने विकली आहेत. त्यांच्याकडे सुमारे 2.67 लाख लोकांचा एक मजबूत इंस्टाग्राम ग्रुप आहे.
रोहनने 2017-18 मध्ये एक सोशल मीडिया एजन्सी देखील सुरू केली. काही काळानंतर रोहनने पायलट प्रोजेक्ट म्हणून बर्गर बे नावाने व्यवसाय सुरू केला आणि तो चांगला चालू लागला. कंपनीचा कारखाना लुधियाना येथे असून चंदीगड आणि गुरुग्राममध्ये कंटेंट क्रिएशन हब आहे. मला बर्गर आवडतात म्हणून कंपनीचे नाव बर्गर बे ठेवल्याचे रोहन सांगतो. सर्व फाऊंडर्सना बर्गर बे स्टार्टअपच्या लोगोची शैली खरोखरच छान वाटली. तिथे अमनने काही कपडेही घेतले ज्यांचे पॅकेजिंग शेकसारख्या बॉक्समध्ये होते. त्या कपड्यांना कॉफी आणि स्ट्रॉबेरीचा वास येत होता. या कपड्यांमध्ये 20 वेळा धुतल्यानंतरही सुगंध टिकतो असा संस्थापकांचा दावा आहे. जेव्हा शो आला तेव्हा कंपनीकडे 6 ते 7 लाख रुपये बँक बॅलन्स होता. जान्हवी सध्या सुमारे 50 हजार रुपये पगार घेते. तर रोहन आणि ओजस्वी यांना प्रत्येकी 28 हजार रुपये पगार मिळतो.
या कंपनीने 2019-20 मध्ये 15 लाख रुपये कमावले. पुढच्या वर्षी हे उत्पन्न जवळजवळ 4 पटीने वाढून 56 लाख रुपये झाले. 2021-22 मध्ये कंपनीने 1.6 कोटी रुपयांची विक्री केली, जी पुढच्या वर्षी 4.6 कोटी रुपयांपर्यंत वाढली. गेल्यावर्षी म्हणजेच 2023-24 मध्ये कंपनीचे उत्पन्न 11.8 कोटी रुपये होते. यावर्षी कंपनीचे एकूण उत्पन्न 15 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे आणि नोव्हेंबरपर्यंत कंपनीने 10 कोटी रुपये कमावले आहेत.
2019 मध्ये स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काळात रोहनने एक चूक केली ज्यामुळे कंपनी दिवाळखोरीतून थोडक्यात बचावली. त्याने एका कंपनीला फक्त 1 लाख रुपयांना 33 टक्के हिस्सा दिला होता. जी एक धोरणात्मक भागीदार देखील होती. कंपनीचे काम कारखान्याशी संबंधित सर्व काम आणि गुणवत्तेकडे लक्ष देणे होते. पण ते करू न शकल्याने अखेर रोहनने कंपनीकडून 30 ते 40 लाख रुपये घेतले. यानंतर रोहनने स्वत:च्या आईकडून सुमारे 2 कोटी रुपये आणि स्वतःच्या बचतीतून काही रक्कम जोडून 33 टक्के हिस्सा 3 कोटी रुपयांना परत विकत घेतला.
कंपनीच्या संस्थापकांनी 40 कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर 2.5 टक्के इक्विटीच्या बदल्यात 1 कोटी रुपये मागितले. विराज आणि नमिता सुरुवातीपासूनच या करारातून बाहेर होते. तर अनुपम, कुणाल आणि अमन यांनी प्रत्येकी दोन ऑफर दिल्या. पहिली ऑफर 10 टक्के इक्विटीच्या बदल्यात 1 कोटी रुपये होती आणि दुसरी ऑफर 20 टक्के इक्विटीच्या बदल्यात 2 कोटी रुपये होती. अखेर, अमन, अनुपम आणि कुणाल यांनी मिळून 20 टक्के हिस्सेदारीच्या बदल्यात संस्थापकांना 2 कोटी रुपये दिले.
रोहन कश्यप शोच्या मंचावर आला तेव्हा तो कॅमेऱ्यासमोर खूपच तणावात दिसत होता. पण त्याची मैत्रीण जान्हवी कॅमेऱ्याला अगदी व्यवस्थित तोंड देत होती. कारण जान्हवी यापूर्वी स्प्लिट्सव्हिला या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये कॅमेऱ्याला सामोरी गेली होती. ज्यामुळे तिचा आत्मविश्वास कॅमेरासमोर दिसला. लुधियानाचे रहिवासी असलेल्या रोहन कश्यप आणि ओजस्वी कश्यप या दोन भावंडांनी हे स्टार्टअप 2019 मध्ये सुरू केले होते. काही वर्षांनंतर 2023 मध्ये कोलकाता येथील जान्हवी सिकारियादेखील सह-संस्थापक म्हणून कंपनीत सामील झाली. त्याचं झालं असं की, जान्हवी आधी या कंपनीची ग्राहक होती.तिच्या दुसऱ्या ऑर्डरमध्ये काहीतरी गडबड झाली आणि तिला तिची ऑर्डर मिळाली नाही. यानंतर जान्हवीने कंपनीला फोन केला आणि कॉल अटेंड करणाऱ्या इंटर्नला फटकारले. यानंतर कंपनीचा संस्थापक रोहनने स्वतः तिला फोन केला आणि भविष्यात जेव्हा ती काही ऑर्डर करेल तेव्हा तिला कंपनीकडून वेगळे काहीतरी खास दिले जाईल, असे वचन दिले. कंपनीने ग्राहकांशी असे वागणे हे जान्हवीला खूप आवडले. यानंतर जान्हवी आणि रोहन बोलू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. 'मला शार्क टॅंक शोमध्ये माझी प्रेयसी आणि व्यावसायिक भागीदार जान्हवी सिकारियाला प्रपोज करायचे होते. मी दोन वर्षांपासून शार्क टँकमध्ये जाण्याची वाट पाहत होतो', असे बर्गर बेचा सह-संस्थापक रोहनने सांगितले. शोमधील माझा अनुभव खूप अद्भुत होता, असेही त्याने पुढे सांगितले.