Shashank Ketkar : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. तो फक्त त्याच्या कामासंबंधीतच गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत नाही तर त्यासोबत तो त्याच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी आणि सामाजिक, राजकीय परिस्थिती असेल त्यावर स्पष्टपणे मत मांडताना दिसतो. सध्या त्यानं शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शशांकनं भारतात माणसांची किंमत नाही अर्थात माणसाचं आयुष्य स्वस्त आहे असं म्हटलं आहे. त्याशिवाय त्या मागचं कारण काय हे देखील त्यानं सांगितलं आहे.
शशांक केतकरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शशांक तो ठाण्याच्या ज्या परिसरात राहतो आणि त्याच्या सोसायटीच्या बाहेर त्यानं जे काही पाहिलं त्यावरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या सोसायटीसमोर एका माणसानं चुकीच्या पद्धतीनं गाडी पार्क केली होती त्यामुळे तिथल्या लोकांना किती अडचण होऊ शकते, त्याशिवाय लोकांना चालायला जागा नाही याविषयी सांगितलं आहे. शशांकनं व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीचा गाडीचा नंबर देखील सांगितला आणि ती गाडी उत्तर प्रदेशची असल्याचं त्यानं म्हटलं. शशांक म्हणाला, 'भारतात माणसाचं आयुष्य आणि जगणं हे अत्यंत स्वस्त आहे. त्याची किंमत शून्य आहे. ठाण्यातील माझ्याच सोसायटीच्या समोर एका माणसाने कमालीचं पार्किंग केलं आहे. रिकाम्या जागेत एक वेगळी गाडी उभी होती, त्यांना ती काढायची होती, म्हणून चार माणसांनी डबल पार्किंग केलेली गाडी आणखी बाहेर आणून ठेवली. आता ती पूर्ण रस्त्यावर आलेली आहे. या गाडीनं रस्त्यावरची इतर जागा इतकी व्यापली आहे की, ज्यामुळे रस्त्यावरच्या लोकांना चालताना समस्या येते.'
पुढे शशांक याविषयी सविस्तर सांगत म्हणाला, 'आपल्याकडे प्रॉब्लेम हाच आहे, या गाडीला आपटून चार माणसं मेली तरी काय फरक पडत नाही. आमच्या वसंत विहारमध्ये डबल पार्किंग करतात हा विषय तर मोठा आहेच. पण डबल पार्किंग केल्यानंतर त्याच्या मागची पार्किंग केलेली गाडी ज्यांना काढायची होती, त्यांनी दुसरी गाडी अशी बाहेर आणून ठेवली ज्याचा लोकांना किती त्रास होणार आहे हे तुम्हीच बघा. आहे की नाही गंमत, खरंच आपल्याकडे जीव स्वस्त झाला आहे. मला माहित नाही ठाणे महानगरपालिकेची ही थेट जबाबदारी असते की नसते. पण त्यांना असं सांगणं आहे की, ही गाडी फक्त उचलून घेऊन जाऊ नका तर स्क्रॅप करा.'
हेही वाचा : रजनीकांत यांची सून होणार सनराइजर्स हैदराबादची मालकिण! कोण आहे काव्या मारनचा होणारा नवरा?
हा व्हिडीओ शेअर करत शशांकनं कॅप्शन दिलं की 'ठिकाण- वसंत विहार ठाणे ! समस्या- डबल पार्किंग! त्रास- घंटा काहीही नाही. उपाय - 4 लोक मेले की बघू.' शशांकनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत हे किती चुकीच आणि वाईट आहे याविषयी बोलताना दिसले.