Shilpa Shetty Net Worth: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज 8 जून 2025 रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पाचा जन्म 8 जून 1975 रोजी कर्नाटकातील मंगळुरु येथे सुनंदा आणि सुरेंद्र शेट्टी यांच्या घरी झाला. 1993 मध्ये ‘बाजीगर’ या सुपरहिट चित्रपटातून शिल्पानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आणि 90 च्या दशकात त्या टॉप अभिनेत्रींपैकी एक ठरल्या.
केवळ अभिनयच नाही, तर आपल्या सौंदर्यानं आणि फिटनेसच्या शिल्पाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. आज ती त्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, संपत्तीच्या बाबतीत ती तिचा नवरा राज कुंद्राच्या तुलनेत बरीच मागे आहे.
18 व्या वर्षी ‘बाजीगर’ चित्रपटातून शिल्पानं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान, काजोल, जॉनी लिव्हर यांसारख्या मोठ्या कलाकारांनी काम केलं होतं. ‘बाजीगर’नंतर शिल्पाच्या करिअरला खऱ्या अर्थानं गती मिळाली. ‘धडकन’, ‘जाणवर’, ‘अपने’, ‘लाइफ इन ए मेट्रो’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये ती झळकली.
शिल्पाचं नाव कधी अक्षय कुमारसोबत खूप चर्चेत होतं. त्यांचं नातं बऱ्याच काळापर्यंत चर्चेत होतं. पण नंतर हे नातं तुटलं आणि शिल्पानं अक्षयवर फसवणुक केल्याचे आरोपही केले. तर त्याच्या बऱ्याच वर्षांनंतर 2009 मध्ये तिनं उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केलं. दोघे आज आलिशान आणि लग्झरीस जीवन जगतात. मुंबईत त्यांचं समुद्रकिनारी घर असून 'किनारा' असं त्याचं नाव आहे. त्याशिवाय लंडनमध्येही त्यांची संपत्ती आहे. सध्या राज कुंद्राची एकूण संपत्ती सुमारे 2800 कोटी रुपये इतकी आहे.
राज कुंद्रांच्या तुलनेत शिल्पाची संपत्ती कमी असली, तरी ती स्वतःही मोठ्या प्रमाणात कमावते. चित्रपटासोबतच ती जाहिरातींमधून, ब्रँड एंडोर्समेंट्समधूनही चांगली कमाई करते. एका चित्रपटासाठी शिल्पा अंदाजे 1 ते 2 कोटी घेते, तर एखाद्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी ती सुमारे 1 कोटी मानधन आकारते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती ही 134 कोटी रुपये आहे. याशिवाय तिचं स्वतःचा यूट्यूब चॅनलही आहे, जिथे ती योगा व फिटनेस टिप्स शेअर करते.