बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा 'रघुवीर' चित्रपटाच्या सेटवर मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. 1995 मध्ये आलेल्या चित्रपटात शिल्पा शिरोडकरसह सुनील शेट्टी, सुरेश ओबेरॉय, सुधा चंद्रन, मोहनीश बेहल, अरुणा इराणी, गुलशन ग्रोव्हर आणि प्रेम चोप्राही मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान शिल्पा शिरोडकरचा गोळी लागून मृत्यू झाल्याची चर्चा रंगली होती. यामुळे अभिनेत्रीच्या घरी सर्वजण घाबरले होते. पण नंतर अभिनेत्रीला हा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता असं सांगण्यात आलं.
'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिरोडकरने हा किस्सा सांगितला. "मी कुल्लू मनालीत होते. त्यावेळी मोबाईल फोन नसल्याने माझे वडील हॉटेलच्या फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मी तिथे सुनील शेट्टीसोबत शुटिंग करत होते. तिथे शूट पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं की ही शिल्पा आहे की दुसरी कोणीतरी कारण त्यांना बातमी माहित होती," अशी आठवण तिने सांगितली.
पुढे ती म्हणाली, "मी जेव्हा रुमवर परतले तेव्हा 20 ते 25 मिस कॉल होते. माझे पालक चिंतेत होते. वृत्तपत्रात शिल्पा शिरोडकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं वृत्त देण्यात आलं होतं".
पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिला नंतर हा प्रमोशनचा भाग असल्याचं तिला सांगितलं. "जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा माझं असं होतं की, ठीक आहे. पण हे थोडं जास्तच झालं. त्यावेळी अशी काही पीआर किंवा इतर गोष्ट नव्हती. असं काही असतं हेच माहिती नव्हतं. असं काही होणार आहे हे समजणारी मी शेवटची व्यक्ती होती. त्यावेळी कोणीही परवानगी घेत नसे. चित्रपट चांगला चालला होता, त्यामुळे मी फार रागावली नव्हती," असा खुलासा तिने केला.
शिल्पा शिरोडकर ही अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण आणि महेश बाबूची मेहुणी आहे. अलीकडच्या काळात तिने तिच्या बहिणी आणि कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध बिग बॉस 18 या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.
दरम्यान, शिल्पा शिरोडकर पुढे जटाधारा मध्ये दिसणार आहे. अनेक वर्षांच्या अंतरानंतर रुपेरी ती पडद्यावर परतली आहे. जटाधारा हा एक अलौकिक रहस्यमय थ्रिलर आहे जो गूढ अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या लपलेल्या गूढ कथेभोवती केंद्रित आहे