Shivaji Satam on ACP Pradyuman Death: सोनी टीव्हीवर सीयआडी मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. चाहत्यांच्या इच्छा आणि मागणीखातर बंद करण्यात आलेली ही मालिका नव्याने सुरु करण्यात आली. मात्र सीआयडीचे नियमित प्रेक्षक आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण मालिकेतील प्रसिद्ध पात्र एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. सोनी टीव्हीने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत अधिकृतपणे तसं जाहीरही केलं आहे. पण गेल्या 27 वर्षांपासून ही भूमिका साकारणारे शिवाजी साटम यांनी आपल्याला याबाबत काही कळवण्यात आलं नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण सध्या कामातून ब्रेक घेतल्याची माहिती दिली आहे.
शिवाजी साटम यांनी Bombay Times ला दिलेल्या मुलाखतीत नव्या एपिसोडमध्ये एसीपी प्रद्युम्न यांची हत्या होताना दाखवण्यात आलं असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं. ते म्हणाले, "मला याबाबत काहीच कल्पना नाही. मी काही वेळासाठी विश्रांती घेतली असून, निर्मात्यांना मालिकेत पुढे काय होणार आहे याची कल्पना आहे. मी सर्वकाही माझ्या मनाप्रमाणे घ्यायला शिकलो आहे आणि जर माझी भूमिका संपली असेल तर माझं काही म्हणणं नाही. पण मला माझी भूमिका संपली आहे की नाही यासंदर्भात काही कळवण्यात आलेलं नाही. मी सध्या मालिकेसाठी शुटिंग करत नाही आहे".
आपण मे महिन्यात मुलासह प्रवास करणार असल्याने ब्रेक घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, "परदेशात राहणारा माझा मुलगा येत असल्याने मी मे महिन्यात सुट्टीवर जाण्याची योजना आखत आहे. मला आधीच्या सीझनमध्ये 22 वर्षं एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका साकारताना मजा आली. हा खूप चांगला प्रवास होता. या मालिकेने मला खूप काही दिलं आहे. सध्या मी फक्त ब्रेक घेत असून, आयुष्याचा आनंद घेणार आहे. मी फार मेहनत केली असून, प्रत्येकाला विश्रांतीचा हक्क आहे. आता मी परतणार की नाही हे निर्मातेच सांगू शकतील".
सीआयडीच्या अलिकडच्या भागात दाखवण्यात आलं आहे की, टीम भयानक गुन्हेगार बारबोझाला (तिगमांशू धुलिया) पकडण्याचा प्रयत्न करत आहे, जो एसीपीला त्याच्या जाळ्यात अडकवतो आणि स्फोटात ठार करतो. तथापि, प्रत्यक्षात हा मृत्यू पडद्यावर दाखवण्यात आला नव्हता, ज्यामुळे अनेकांना असे वाटले की हे पात्र परत येऊ शकते.
शनिवारी रात्री उशिरा सोनीने इंस्टाग्रामवर एसीपी प्रद्युम्न यांचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये लिहिले आहे, "एसीपी प्रद्युम्न यांच्या प्रेमळ स्मृतीत... कधीही विसरता येणार नाही असे नुकसान." या फोटोच्या खाली 'एका युगाचा अंत. एसीपी प्रद्युम्न (1998-2025)' असंही लिहिलं आहे. यामुळे या पात्राच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचं दिसत आहे.
बीपी सिंग यांचा सिंग आणि प्रदीप उप्पूर निर्मित सीआयडी हा शो 1998 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होत आहे. या काळात शोचे जवळजवळ 1600 भाग प्रसारित झाले आहेत आणि तो सर्वात लोकप्रिय भारतीय टीव्ही शोपैकी एक म्हणून उदयास आला आहे.