Viral Video : भारतात ज्याप्रमाणे क्रिकेटला लोकप्रियता मिळाली आहे अगदी त्याचप्रमाणे या देशात कलाविश्वाप्रतीसुद्धा चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली आहे. पण, हीच उत्सुकता जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा मात्र या विषयी विचार करण्यास अनेक मंडळी भाग पडतात. काहीसा असाच अपेक्षित आणि विचार करायला भाग पाडणारा प्रकार नुकताच 'पुष्पा 2' फेम अभिनेत्रीसोबत घडला आणि नेटकऱ्यांनीसुद्धा त्यावर संताप व्यक्त केला.
अभिनेत्री श्रीलीला आणि अभिनेता कार्तिक आर्यन सध्या अनुराग बसूच्या एका चित्रपटासाठी चित्रीकरण करत असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्य़ान एक अतिशय विचित्र घटना घडल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर आलं. हा व्हिडीओ पाहून समाज नेमका कोणत्या दिशेला चाललाय हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
कार्तिक आणि श्रीलीला गर्दीतून वाट काढत जात असतानाच अभिनेता पुढे गेला. मात्र श्रीलीलासोबत सेल्फी घेण्यासाठी म्हणून या जमावानं तिला अचानक मागच्या मागे ओढलं. तोपर्यंत कार्तिक इतका पुढे गेला की त्याचा ती मागेच राहिल्याचंही लक्षात आलं नाही. अखेर टीममधीलच एका व्यक्तीनं गर्दीत जाऊन श्रीलीलाला तिथून बाजूला आणलं.
एका क्षणात त्या ठिकाणी जे काही घडलं ते पाहून श्रीलीलासुद्धा हादरली. इतक्या जमावाला पाहून नेमकं काय घडलं हेच तिच्या लक्षात येईना. परिस्थिती मारून नेण्यासाठी म्हणून तिनं कसंबसं चेहऱ्यावर हसू आणलं मात्र तिथं जो प्रकार घडला तो नक्कीच योग्य नव्हता हे तिच्यासह तिच्यासोबतच्या टीमच्याही लक्षात आलं.
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि तो कधी चित्रीत करण्यात आला यासंदर्बातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र कलाकारांसोबत घडणारा हा प्रकार पाहता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चाहत्यांनी उपस्थित केला. इतकंच नव्हे, तर उत्साहाच्या भरात अनेकदा चाहतेच मर्यादा सोडून वागतात आणि हे असं व्हायला नको, असा आग्रही सूरसुद्धा काही नेटकऱ्यांनी आळवत ही परिस्थिती भीषण असल्याचं म्हटलं.