Shubhangi Gokhale Post: आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. 6 जुलै रोजी आषाढी वारी आहे त्या दिवशी वारकरी पंढरीत पोहोचतील. सध्या माऊलींच्या पालख्यांनी अवघड टप्पा पार करत पुढील प्रवास सुरू केला आहे. सोशल मीडियावरदेखील वारीचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होताना दिसताहेत. अशातच वारकऱ्यांबरोबरच अनेक हौशी नागरिक वारीत सहभागी होतात. पण बऱ्याचदा या वारीत अनेक रिलस्टारही सहभागी होताना दिसताहेत. फोटो व व्हिडिओसाठी धडपडताना दिसताहेत. यांवर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी खडे बोल सुनावले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी या रिलस्टारचे कान टोचले आहेत.
शुभांगी गोखले यांनी एक पोस्ट केली आहे. यात विठ्ठल उभा असून त्याच्यासमोर संत तुकाराम दिसत आहेत. तसंच त्यांनी वारीत शोऑफ करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. त्या म्हणतात की, खूप वर्षांपासून मनात येत रहातं. वारी वर्षानुवर्षं शांतपणे, शिस्तबद्ध चाललेली असताना
तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटं नी केळी वाटायची, मेकअप करून त्या अन्नपूर्णांच्यामध्ये जबरदस्तीनी घुसून भाक-या भाजायच्या. असे अनेक प्रकार करून क्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा.. कशासाठी?, असा सवाल त्यांनी केला आहे.
तसंच, त्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की, काही दिवसांत काजवा महोत्सव नामक प्रकार सुरू होईल. त्यांचा मिलनाचा काळ. मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तीला आकर्षित करत असतात. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत, टॉर्चेसचा प्रकाश न् बडबड करून घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा.. खूप लिहायचंय पण उद्विग्नतेमुळे थकले. रामकृष्ण हरी पांडुरंगा, सांभाळ रे, असं त्यांनी म्हटलं आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे रोटी घाटात उत्साही स्वागत करण्यासाठी दौंड ते रोटी घाट या 45 किलोमीटरच्या टप्प्यावर आकर्षक रांगोळींच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या सुंदर उपक्रमात भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, खुटबाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, रोटी घाटातील संपूर्ण मार्ग रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजला आहे.