Sonali Bendre Interview: अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही सध्या प्रकाशझोतापासून दूर आहे. मागील काही काळात सोनालीचा एकही चित्रपट अथवा मालिका अथवा वेब सिरीजही प्रदर्शित झालेली नाही. मात्र वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमामधून सोनाली सार्वजनिक मंचांवर दिसून आली. मध्यंतरी तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. खरं तर सोनालीचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. सोनाली पुन्हा चर्चेत येण्यामागे कारण ठरलं आहे तिने अफेरबद्दल केलेलं विधान.
सोनालीने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनेकदा सहकलकारांबरोबर नावं जोडली जाण्याच्या विषयावर भाष्य केलं. सहकलाकारांसोबत नाव जोडलं जाणं, सहकलाकारांकडून टाकला जाणारा दबाव यासारख्या प्रश्नांना 'टाइम्स नाऊ'च्या मुलाखतीत सोनालीने बेधडक उत्तरं दिलं. "मी कधीच एक चूक दुसऱ्यांदा केली नाही. मी माझ्या अनुभवातून शिकत गेले. एखाद्या गोष्टीकडून मला धडा शिकता आला की त्या गोष्टी कशा पद्धतीने हाताळाव्यात हे मला समजू लागले. मग पुढल्या वेळेस मी त्या गोष्टी (चुका) माझ्या हातून घडणार नाहीत, याची काळजी घ्यायचे," असं सोनालीने मुलाखतीत सांगितलं.
लहानपणापासूनच आपल्याला बदलांशी जुळवून घेण्याचे संस्कार जडणघडणीमुळे मिळाल्याचं सोनालीने आवर्जून सांगितलं. बालपणापासूनच मला अनेक शहरं आणि अनेक शाळा बदलाव्या लागल्याने होणार्या बदलांशी मी सहजपणे जुळून घ्यायला शिकले. नवीन वातावरणाशी जुळवून घेताना मी स्वावलंबी झाले. मला आजूबाजूच्या लोकांकडून कौतुक व्हावं याची गरजही वाटली नाही. त्यामुळे तसा दबावही जाणवला नाही, असं सोनालीने मुलाखतीदरम्यान सांगितलं.
मनोरंजनसृष्टीमध्ये अनेकदा अभिनेत्रीचं नाव सहकलाकारांसोबत जोडलं जातं, त्याच्या कथित अफेअर्सचीही चर्चा होते. याबद्दलही सोनालीने भाष्य करताना, "असे प्रकार म्हणजे पत्रकारांची कल्पनाशक्तीच असते, याची मला जाणीव झाली. हल्ली 'क्लिकबीट'बद्दल फार बोललं जातं. पूर्वीचा काळ हा हेडलाइन्सचा होता. केवळ मथळ्यांवरुन पेपर विकले जायचे. मात्र अनेकदा केवळ निर्मात्याला प्रसिद्धी हवी असल्याने अथवा कालाकारांना त्यांच्याबद्दल चर्चा व्हावी, चांगलं वाटून घ्यावं अशी इच्छा असल्याने अशा गोष्टींची चर्चा होताना दिसते," असं म्हटलं. "खरं तर अशा चर्चा होण्याची अनेक कारणे आहे. म्हणूनच यासाठी कोणा एका व्यक्तीला दोष देता येणार नाही. हा सारा प्रकार त्या क्षेत्राचा भाग असतो. ज्या क्षेत्राने मला प्रसिद्धी, पैसा आणि काम दिले त्याचेच हे साईड इफेक्ट्स असतात," असं सोनाली पुढे बोलताना स्पष्ट केलं.
सोनाली लवकरच एका वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मिर्झापूर' फेम अली फजल हा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे.