Sonalee Kajol Fan Girl Moment: लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या नृत्यकौशल्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आज तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असला, तरी सोनाली स्वतःही एका लोकप्रिय अभिनेत्रीची मोठी चाहती आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे काजोल.
सोनाली कुलकर्णी लहानपणापासून काजोलची चाहती असून तिच्या गाण्यांवर थिरकत मोठी झाली आहे. तिला भेटण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती आणि अखेर ती इच्छा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पूर्ण झाली.
5 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या या सोहळ्यात सोनालीने काजोलच्या काही लोकप्रिय गाण्यांवर नृत्यसादरीकरण केलं. सादरीकरणानंतर काजोलने सोनालीला मिठी मारून कौतुक केलं. हा क्षण सोनालीसाठी अतिशय खास ठरला आणि तिने हा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला.
पोस्टमध्ये सोनालीने लिहिलं, 'काजोलची मी लहानपणापासून मोठी चाहती आहे. 'मेरे ख्वाबों में जो आए'सारख्या तिच्या गाण्यांवर आरश्यासमोर नाचत राहिली आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात तिच्यासमोर तिच्यासाठी सादरीकरण करण्याची संधी मिळणं ही इतकी अप्रतिम गोष्ट आहे की ती मी शब्दांत मांडू शकत नाही. तिचा निखळ अभिनय, स्वच्छंदी स्वभाव, ऑनस्क्रीन-ऑफस्क्रीन जिवंतपणा, बिनधास्तपणे जगण्याची वृत्ती आणि निरागसपणा मला नेहमीच भुरळ घालतो.'
हे ही वाचा: 'सध्या मुलं जन्माला घालू नका' बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीच्या विधानाने एकचं खळबळ
तिने पुढे म्हटलं, 'माझ्या सादरीकरणानंतर तिचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा एका कलाकाराकडून दुसऱ्या कलाकाराला मिळालेला सर्वोत्तम सन्मान आहे. ती मिठी आणि कौतुकाचे शब्द मी कायम लक्षात ठेवेन. याआधी मला श्रीदेवी आणि लता मंगेशकर यांना मानवंदना देण्याची संधी मिळाली होती, पण यावेळी काजोलच्या वाढदिवशी, तिच्या गाण्यांवर, तिच्यासमोर प्रत्यक्ष नाचणं ही एका प्रामाणिक चाहतीकडून तिच्या सुपरस्टारला दिलेली खास भेट होती.'
दरम्यान, या सोहळ्यात काजोलला 'राजकपूर विशेष योगदान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे, हा सन्मान मिळाल्याचं दुहेरी आनंद होता, कारण त्याच दिवशी काजोलचा वाढदिवसही होता. पुरस्कार स्वीकारताना तिची आई, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, देखील उपस्थित होत्या.