Sonu Sood Video: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नेहमीच आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. अशातच सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो स्वतःच्या हाताने साप पकडताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यासोबतच चाहते त्याच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोनू सूदने व्हिडिओमध्ये म्हटेल आहे की, मी पकडलेला हा साप विषारी नाहीये. पण तरीही असा साप पकडण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतः करू नका. तो पुढे म्हणाला की, मी यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले आहे आणि हे काम अनुभवाशिवाय कोणी करू नये. व्हिडिओमधील साप त्याच्या सोसायटीत आढळला होता आणि सोनू सूदने त्याला एक बॅगमध्ये पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
चाहत्यांकडून अभिनेत्याच्या धाडसाचं कौतुक
सोनू सूदने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, हर हर महादेव! सध्या श्रावण महिना सुरू असल्याने महादेव आणि साप यांचा संबंधही चाहत्यांनी अधोरेखित केला. अनेकांनी सोनू सूदच्या या कृतीचे कौतुक केले असून काहींनी त्याला रिअल हिरो असंही म्हटलं आहे.
एका चाहत्याने त्याच्या या व्हिडीओवर कमेंटमध्ये म्हटलं आहे की, रिअल हीरो, हर हर महादेव, देव आपल्याला सुरक्षित ठेवो! तर दुसऱ्याने लिहिले, माणसांनंतर आता प्राण्यांना देखील घरपोच सेवा देत आहेत सोनू भाई! अनेक चाहत्यांनी त्याच्या या संवेदनशीलतेचं आणि धाडसाचं भरभरून कौतुक केलं.
सोनू सूदला मिळाला 'मिस वर्ल्ड ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड' अवॉर्ड
सोनू सूदला अलीकडेच त्याच्या सामाजिक कार्याबद्दल ‘मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आलं आहे. कोरोनाच्या काळात त्याने हजारो लोकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात मदत केली होती. सोनू सूद वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच त्याच्या स्वतःच्या लेखन आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘फतेह’ या अॅक्शन चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, जॅकलिन फर्नांडिस, विजय राज आणि दिब्येंदु भट्टाचार्य हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.