Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरुख खानला नेमक्या कोणत्या निकषावर राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे? ज्येष्ठ अभिनेत्री स्पष्टच बोलली, 'हे प्रश्न विचारायला हवेत'

दाक्षिणात्य अभिनेत्री उर्वशी यांना जानकी बोडीवालासोबत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. यानंतर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे.   

शाहरुख खानला नेमक्या कोणत्या निकषावर राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे? ज्येष्ठ अभिनेत्री स्पष्टच बोलली, 'हे प्रश्न विचारायला हवेत'

1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी पुरस्कार जाहीर झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, सेलिब्रेशन केलं जात आहे. शाहरुख खानसाठी हा पुरस्कार विशेष आहे कारण त्याच्या 33 वर्षाच्या कारकिर्दीतील हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. शाहरुखनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरस्कारासाठी आभार मानले आहेत. दरम्यान अनेकांना जवान चित्रपटासाठी शाहरुखला पुरस्कार दिलेलं पटलेलं नाही. सोशल मीडियावर 'स्वदेस' चित्रपटातील त्याचे सीन शेअर करत हा प्रलंबित पुरस्कार जवानच्या निमित्ताने मिळाला असं मत मांडलं जात आहे. 

दाक्षिणात्य अभिनेत्री उर्वशी यांनाही शाहरुख खान पुरस्कारासाठी पात्र नसल्याचं वाटत असून, त्यांनी जाहीरपणे आपलं मत मांडलं आहे. उर्वशी यांना उल्लोझुक्कुसाठी (Ullozhukk) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीच्या परीक्षकांमध्ये निष्पक्षतेचा अभाव दिसत असल्याचं परखड म्हणणं त्यांनी मांडलं आहे. 

Asianet Newsशी संवाद साधताना त्यांनी एका मोठ्या चिंतेकडे लक्ष वेधले. ज्येष्ठ मल्याळम अभिनेते विजयराघवन यांनाही उर्वशी यांच्यासह सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. पण उर्वशी यांच्या मते त्यांचा अभिनय सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी अधिक पात्र होता.

"विजयराघवन हे एक महान अभिनेते आहेत. विजयराघवन आणि शाहरुख खान यांच्या अभिनयातील फरक समजून घेण्यासाठी ज्युरींनी नेमक्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या ? एकाला सहाय्यक अभिनेता आणि दुसऱ्याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार कसा काय दिला ? नेमके कोणते निकष लावण्यात आले? आपणही कर भरणारे नागरिक असल्याने आपण असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. कुटेटन (विजयराघवनचा संदर्भ देत) यांना चित्रपटसृष्टीत दशकांचा अनुभव आहे. हा चित्रपट इतर भाषांमधील चित्रपटांसारखा मोठ्या बजेटचा, 250 दिवसांच्या शुटिंगला प्रोजेक्ट नव्हता," असंही त्यांनी म्हटलं आहे.

उर्वशीने यांनी यावेळी विजयराघवन 'पुक्कलम'मधील त्यांच्या भूमिकेसाठी किती वचनबद्ध होते याबद्दलही सांगितलं. या चित्रपटात त्यांनी 100 वर्षांच्या वृद्धाची भूमिका निभावली आहे. आपल्याला चित्रपटात त्यांच्या -स्क्रीन जोडीदाराची भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु खूप मेकअप करावा लागणार असल्याने आपण नकार दिल्याचं त्यांनी म्हटलं. 

"पूक्कालममध्ये त्यांच्या जोडीदाराची भूमिका करण्यासाठी सुरुवातीला मला विचारण्यात आलं होते. तरीही, मी नकार दिला कारण या भूमिकेसाठी मला एक महत्त्वपूर्ण शारीरिक परिवर्तन करावं लागणार होतं, ज्यासाठी मला अनेक तास मेकअप खुर्चीवर बसावे लागले असते. मी त्यांना सांगितले, जरी तुम्ही मला कोटी रुपये दिले तरी मी ते करणार नाही. पण त्यांनी इतकं वय असतानाही ते सर्व सहन केलं आणि अभिनय केला. किमान त्यासाठीच विशेष उल्लेख मिळायला हवा. ते फक्त एक सहाय्यक अभिनेते कसे काय आहेत? हे कोणत्या आधारावर ठरवले गेले? मी फक्त इतकंच सांगत आहे की, काही निष्पक्षता असली पाहिजे," असं त्या पुढे म्हणाल्या.

शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. 12 फेलसाठी विक्रांत मेस्सीसोबत त्याला हा पुरस्कार शेअर करावा लागणार आहे. तर विजयराघवन यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट 'पुक्कलम' मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री के. पी. ए. सी. लीला यांच्यासोबत भूमिका साकारली. विशेष म्हणजे, उर्वशी यांनाही जानकी यांच्यासोबत पुरस्कार विभागून देण्यात आला आहे, ज्यांनी गुजराती चित्रपट 'वाश'मधील अभिनयासाठी जिंकला.

FAQ

1) शाहरुख खान यांना कोणत्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
शाहरुख खानला 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा त्याचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे

2) या पुरस्काराबाबत काय वाद झाला आहे?
काही समीक्षक आणि प्रेक्षकांना शाहरुख खानला ‘जवान’ साठी पुरस्कार मिळाल्याबाबत आश्चर्य वाटले आहे, कारण त्याच्या स्वदेस किंवा चक दे! इंडिया यासारख्या चित्रपटांना यापूर्वी पुरस्कार मिळाला नव्हता. दक्षिण अभिनेत्री उर्वशी यांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला, की मल्याळम अभिनेता विजयराघवन यांच्या तुलनेत शाहरुख यांचा अभिनय कसा सर्वोत्कृष्ट ठरला? तसेच, काहींचे मत आहे की हा पुरस्कार शाहरुख यांच्या लोकप्रियतेला आणि बॉक्स ऑफिस यशाला दिलेली मान्यता आहे

3) शाहरुख खानचा पुढील चित्रपट कोणता आहे?
शाहरुख खान यांचा पुढील चित्रपट आहे ‘किंग’, ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. यात त्याची मुलगी सुहाना खान, अभिषेक बच्चन, आणि दीपिका पादुकोण यांच्या भूमिका असतील.

Read More