Ram Charan : राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. हैदराबादच्या शमशाबादजवळ राम चरण हा त्यांच्या पहिल्या आगामी चित्रपटाची निर्मिती करत आहे. ज्याचे नाव 'द इंडिया हाऊस' असं आहे. या चित्रपटाच्या सेटवर एक मोठी पाण्याची टाकी भरून ठेवण्यात आली होती. तिथे एक अॅक्शन सीन शूट करताना ती पाण्याची टाकी अचानक फुटली आणि मोठी दुर्घटना घडली. मोठी टाकी अचानक फुटल्यामुळे तिथे असणाऱ्या सेटवर पूर स्थिती सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे राम चरणच्या चित्रपटाच्या सेटचं मोठं नुकसान झालं. त्यासोबतच या गुर्घटनेत सेटवरील अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अचानक पाण्याची टाकी फुटल्यामुळे सेटवर पूरस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये सेटवरील अनेक क्रू मेंबर्स जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत एक कॅमेरामन गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. तसेच इतर क्रू मेंबर्स देखील यामध्ये किरकोळ जखमी आहेत. याचाच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सध्या सोशल मीडियावर राम चरणच्या चित्रपटाच्या सेटवरील एका दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टाकी फुटतानाचे दृष्य कैद झाले आहे. तसेच या ठिकाणी असणारे याच चित्रपटाचे इतर सेट आणि तेथील असणारे सामान यामुळे खराब झाले आहे. या दुर्घटनेच्या वेळी अभिनेते निखिल सिद्धार्थ आणि निर्माता-कलाकार राम चरण हे उपस्थित होते का नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेवर राम चरणची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
या दुर्घटनेनंतर सध्या या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. त्यासोबतच या घटनेत जखमी झालेल्या क्रू मेंबर्सच्या उपचारावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जखमींना हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या ही दुर्घटना नेमकी कशी घडली. यावेळी सेटवर किती मेंबर्स उपस्थित होते याबाबत तेथील पोलीस अधिक तपास करत आहेत. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ हा मुख्य भूमिकेत आहे. त्यासोबतच या चित्रपटात अनुपम खेर देखील दिसणार आहेत. हा चित्रपट राम चरणच्या मॅडन प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनवण्यात येत आहे.