Battle Of Galwan: 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटातील सलमानच्या पहिल्या मोशन पोस्टरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि आता सलमानच्या या आगामी चित्रपटात सलमानसोबत कोणती अभिनेत्री असणार त्याची इंटरनेटवर चर्चा सुरु झाली आहे. यापुर्वी चित्रपटासाठी एका अभिनेत्राचे नाव चर्चेत होते ते म्हणजे चित्रांगदा सिंगचे. काही काळापूर्वी दिग्दर्शक अपूर्व लाखियाने अखेर या चर्चेला पूर्णविराम देत चित्रांगदाची भूमिका निश्चित असल्याचे जाहीर केले.
सलमानसोबत चित्रांगदाची पहिलीच जोडी
49 वर्षीय चित्रांगदा सिंग गेली 20 वर्षे चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. मात्र, तिने आजपर्यंत कधीही सलमानसोबत स्क्रीन शेअर केलेली नव्हती. त्यामुळे ती सलमानसोबत पहिल्यांदाच झळकणार असल्याची बातमी येताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.
दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांचा खुलासा
दिग्दर्शक अपूर्व लाखियाने सांगितले, 'हजारों ख्वाहिशें ऐसी' आणि 'बॉब बिस्वास'मध्ये तिचा जबरदस्त अभिनय पाहिल्यापासून मला तिच्यासोबत काम करायचंच होतं.' त्यांनी पुढे म्हटले, 'बॅटल ऑफ गलवान'च्या टीममध्ये चित्रांगदाचे स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ती ताकद आणि संवेदनशीलतेचं अनोखं मिश्रण घेऊन येते, जे सलमान सरांच्या गंभीर आणि शांत स्वभावाला आणखी उठाव देईल.'
चित्रांगदाचाही आनंद व्यक्त
चित्रांगदा सिंगने देखील आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे या चित्रपटात सहभागी होत असल्याची पुष्टी केली. तिने पांढऱ्या सूटमधील एक सुंदर फोटो शेअर करत लिहिले, 'मला या प्रोजेक्टचा भाग बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे खरोखरच खूप खास आहे. संपूर्ण टीमसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.'
चित्रपटाची कथा आणि सलमानची तयारी
हा चित्रपट 2020 मधील चीन-भारत संघर्षावर आधारित असून, यात सलमान खान कर्नल संतोष बाबूंची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप घोषित झालेली नाही.
दरम्यान, दिग्दर्शक अपूर्व लाखियाने इन्स्टाग्रामवर सलमानच्या तयारीचा एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओ धुसर ठेवण्यात आला असून, त्यात सलमानचा आवाज ऐकू येतो आणि तो तीव्र लढाईच्या दृश्यासाठी शारीरिक तयारी करताना दिसतो. अपूर्वाने लिहिले, 'सराव परिपूर्ण बनवतो. कष्ट नाही तर फायदा नाही.'