Nimrat Kaur : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एक भारतीय सैन्यातील मेजर दिसत आहेत. त्यांच्या मांडीवर बसलेली ही चिमुकली बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. महत्त्वाचं म्हणजे कुटुंबात कोणीही या क्षेत्रातून नसताना तिनं स्वत: च्या मेहनतीनं या क्षेत्रात स्थान मिळवलं. ही चिमुकली स्प्रिंटर होची पण एका आजारामुळे तिनं रनिंग सोडलं आणि त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली. पण या अभिनेत्रीच्या वडिलांना दहशतवाद्यांनी पकडलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केली होती. तिचे वडील शहिद झाल्यानंतर त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
फोटोत दिसणारी ही चिमुकली मुलगी दुसरी कोणी नसून निम्रत कौर आहे. आज त्याच ठिकाणी तिच्या वडिलांची मूर्ती बनवण्यात आली आहे. निम्रतचा जन्म राजस्थानच्या पिलानी गावात एका शीख कुटुंबात झाला. तिचे वडील, भूपेंद्र सिंह, भारतीय सैन्यात मेजर होते. जेव्हा निमरत 11 वर्षांची होती, तेव्हा ते कुटुंबासोबत काश्मीरमध्ये गेले होते. त्या वेळी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेनं तिच्या वडिलांचं अपहरण केलं आणि त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांनी देशासाठी प्राण गमावले आणि त्यांना मरणोत्तर शौर्यचक्राने गौरवण्यात आलं.
निम्रतनं 'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'दहशतवाद्यांची इच्छा होती की तिच्या वडिलांनी त्यांच्या सुटकेच्या बदल्यात काही दहशतवाद्यांना सोडावे. पण तिचे वडील यासाठी तयार नव्हते आणि दहशतवाद्यांना जो त्रास दिला तो सहन केला आणि मग त्यानंतर दहशवाद्यांनी त्यांना गोळी झाडली.' वडिलांच्या हत्येनंतर निम्रत आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदललं. तिची आई तिला आणि तिच्या बहिणीला दिल्लीला घेऊन आली. निम्रत कौरनं कॉलेजपर्यंत शिक्षण केलं. पण पुढे ती शिकू शकली नाही. त्यामुळे मग तिनं मॉडेलिंगमध्ये नशिब आजमावलं आणि तशी ती अभिनय क्षेत्रात आली.
लहानपणी निम्रत एक अॅथलिट (स्प्रिंटर) होती. पण 9 वर्षांच्या वयात तिला रुमॅटिक हार्ट फिव्हर नावाचा आजार झाला आणि त्यामुळे तिला खेळणं थांबवावं लागलं. त्यानंतर तिचं लक्ष अभिनय आणि मॉडेलिंगकडे वळलं. तिने अनेक ऑडिशन्स दिले, पण सुरुवातीला तिला सतत नकारच मिळाले. तरीही तिने हार मानली नाही. हळूहळू ती जाहिरातींमध्ये दिसू लागली आणि मग एक म्युझिक व्हिडीओतून तिला ब्रेक मिळाला.
हेही वाचा : अभिजीत सावंतने लग्नानंतर टिंडरवर बनवलं अकाऊंट; म्हणाला '2-3 बायकांना भेटलो, तर बायकोला...'
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लंच बॉक्स’ चित्रपटातून निम्रत प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिने इरफान खानसोबत काम केलं आणि तिनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्वत: ची जागा केली. यानंतर तिने ‘एयरलिफ्ट’, ‘दसवी’, ‘स्कायफोर्स’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं. एवढंच नाही, तर ती हॉलिवूडमधल्या ‘होमलँड’, ‘वेवार्ड पाइन्स’, आणि ‘फाउंडेशन’ या वेब सीरिजमध्येही दिसली.