Marathi News> मनोरंजन
Advertisement

'पिचर्स' फेम अभिनेत्याला बॉलिवूडची लॉटरी, समलैंगिक प्रेमकहाणीतून प्रेक्षकांच्या भेटीला

चौकटीबाहेरच्या विषयाला हाताळत बी- टाऊनचा आघाडीचा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला. 

'पिचर्स' फेम अभिनेत्याला बॉलिवूडची लॉटरी, समलैंगिक प्रेमकहाणीतून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : 'टीव्ही एफ'च्या या युट्यूब वाहिनीच्या विविध वेब सीरिज तरुणाई आणि एकंदरच प्रेक्षक वर्गामध्ये विशेष चर्चेचा विषय ठरतात. नवनवीन विषय हाताळत त्यांना सध्याच्या पिढीला पटेल याच शैलीत ते सादर करण्याच्या अंदाजामुळे त्यांच्या वेब सीरिजमधून झळकणारे कलाकारही चांगलेच लोकप्रियतेत येतात. उदाहरणार्थ 'पिचर्स' म्हणू नका किंवा मग 'कोटा फॅक्टरी'. 

सोशल मीडिया आणि तरुणाईमध्ये अतिशय गाजलेल्या या सीरिजमधून एक चेहरा प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. ज्याला आता थेट बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची आणखी एक संधी मिळाली असल्याच्या चर्चा आहेत. प्रेक्षकांच्या मनात घर केलेला तो चेहरा आहे, अभिनेता जितेंद्र कुमार याचा. 

नेहमीच आव्हानात्मक आणि तितक्याच आश्वासक कथानकांनाचा स्वीकार करत रुपेरी पडद्यावर त्यांना साकारणाऱ्या अभिनेता आयुषमान खुरानाची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार आहे. 

'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं या चित्रपटाचं नाव आहे. ज्यामधून एक समलैंगिक प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून आयुषमानची साथ देत त्याचा love interest म्हणजेच साथीदार म्हणून जितेंद्रची वर्णी लागली आहे. सूत्रांनी याविषयीची माहिती दिली. 

चित्रपटाचं कथानक आणि या भूमिकेची एकंदर गरज पाहता, लहान खेड्यातील एखाद्या मुलाची व्यक्तीरेखा साकारली जाणं अपेक्षित होतं. ज्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांना ती भूमिका अगदी चोखपणे बजावणारा चेहरा हवा होता. शिवाय तो चेहरा नवा असणंही अपेक्षित होतं. या साऱ्या अपेक्षा पाहता जितेंद्र त्याकरता अगदी योग्य पर्याय ठरल्यामुळे त्याचं नाव पुढे केलं गेल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, जितेंद्र किंवा चित्रपटाशी संबंधित अन्य कोणाकडूनही याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. असं असलं, तरीही आतापासूनच या चित्रपटात जितेंद्रची वर्णी लागल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाचा सिक्वल आहे. २०२० मध्ये व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More