Unch Majha Zoka : काही मालिका इतक्या खास असतात की कथानकांसोबतच या मालिका त्यातील कलाकारांमुळंही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. आजवर अशा अनेक कमाल मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आला. काहींच्या कथानकानं इतिहास उलगडून दाखवला, तर काहींच्या कथानकानं अफलातून पात्र समोर आणली. अशीच एक मालिका होती, 'उंच माझा झोका'.
रमाबाई रानडे यांचा जीवनप्रवास आणि त्याच्या या प्रवासात त्यांच्या पतीसह इतरांचाही मोलाचा वाटा नेमका कसा राहिला याची सुरेख आखणी आणि सादरीकरण या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेनं फार कमी वेळातच सर्वांच्या मनाता ठाव घेतला. प्रत्येक पात्र साकारताना कलाकारांनी त्यात जीव ओतला आणि यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय भूमिका ठरली ती म्हणजे लहानग्या 'रमा'ची.
अतिशय संवेदनशीलपणे या मालिकेतून रमाबाई रानडे यांची व्यक्तिरेखा साकारण्यात आली आणि त्यांच्या बालपणीच्या भूमिकेत दिसली बालकलाकार तेजश्री वालावलकर. अतिशय कमी वयातच तेजश्रीया या भूमिकेसाठीची संधी मिळाली आणि या अतिशय महत्त्वाच्या संधीचं तिनंही सोनं केलं. तेजश्रीच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनाता ठाव घेतला, या मालिकेत खऱ्या अर्थानं तिनं साकारलेली 'रमा' जीव ओतून गेली.
हीच तेजश्री आता पुन्हा एकदा या मालिकेच्या आठवणी रमली असून, नऊवारी नेसलात तिला पुन्हा 'रमा' आठवली. मग काय? सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं एक छानशी पोस्ट लिहीत भावनांना वाट मोकळी करून दिली. या पोस्टमध्ये तेजश्री लिहिते, 'उंच माझा झोका….फक्त माझ्याच नाही तर प्रत्येक रसिक प्रेक्षाच्या मनात अधिराज्य गाजवणारी एक आठवण आहे. नऊवारीमध्ये तयार झाल्यावर अर्थातच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि पुन्हा तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला. मीच ओलांडले मला म्हणत प्रत्येक स्त्री मुलगी आज मुक्त आणि स्वावलंबी आहे म्हणत पुन्हा एकदा रमाबाईंच्या कार्याने मन भरून आलं. रमा ही हाक पुन्हा कानावर पडली आणि अजून ही सगळे किती प्रेम करतात याची खात्री आणि जाणिवेने मन भरून गेलं . आज इतक्या वर्षांनी ही सर्वांच मिळणार प्रेम मंत्रमुग्ध करणारं आहे. ही देवाची कृपा त्याच्याच चरणी बसले असताना सहज आठवणींना उजळा द्यायला गाणं ओठी आलं आणि हा क्षण टिपला गेला. सुरात नाही भावात अडकले आणि भावुक झाले इतकंच.'
मालिकेचं शीर्षक गीत गाताना तेजश्रीनं 'रमा'सोबत असणारं तिचं एक सुरेख नातं सर्वांपुढे आणलं आणि इतक्या वर्षांनंतर पुन्हा तिला या 'रमा'च्या रुपात पाहून चाहतेसुद्धा गतकाळात आणि 'उंच माझा झोका'च्या आठवणीत रमले.