Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं शुक्रवारी (4 एप्रिल 2025) निधन झालं. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीपर सिनेमांमुळे 'भारत कुमार' अशी ओळख निर्माण करणाऱ्या आणि जनमानसात कमालीची लोकप्रिय असणाऱ्या याच अभिनेत्याला पद्मश्री, दादासाहेब फाळके या आणि अशा इतरही अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
70 च्या दशकात देशभक्तीनं प्रेरणा घेत मनोज कुमार यांनी कलेच्या अर्थात चित्रपटांच्या प्रभावी माध्यमातून देशातील नागरिकांच्या मनावर देशाभिमान जागवतील असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट साकारले. एक सच्चा देशभक्त कलाकार अशी त्यांची ओळख करून देण्यात कोणतीही अतिशयोक्तीय वाटायला नको. सहकलाकार जिथं विनोदी, साहसपट अशा माध्यामातून लोकप्रियता मिळवत होते तिथंच मनोज कुमार यांनी मात्र देशप्रेमाच्या भावनेला कलेची जोड देत एक यशस्वी वाटचाल केली.
हिंदी कलाविश्वास असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी याच कलेच्या बळावर लोकप्रियता मिळवत प्रचंड श्रीमंतीसुद्धा कमवली. मात्र मनोज कुमार हे एक असं नाव होतं ज्या कलाकारानं संपत्तीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेमच अधिक प्रमाणात कमवलं. देशभक्तीपुढं या कलाकारानं कधीच पैशांना महत्त्वं दिलं नाही असं म्हटलं जातं. किंबहुना हे त्यांच्या आचरणातूनच अनेकदा स्पष्ट झाल्याचंही अनेकांचं मत.
हिंदी सिनेजगतात मोलाचं योगदान देणाऱ्या या अभिनेत्याच्या एकूण संपत्तीचा आकडा कधीच जाहीरपणे समोर आला नाही. मात्र सेलिब्रिटी नेटवर्थच्या माहितीनुसार मनोज कुमार यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये 20 मिलियन डॉलर अर्थात 170 कोटी रुपये इतरी कमाई केली.
मनोज कुमार यांचा जन्म मुळचा पाकिस्तानचा. हरिकृष्ण गिरि गोस्वामी अशी त्यांची खरी ओळख. मात्र हिंदी कलाजगतामध्ये त्यांनी मनोज कुमार याच नावानं कमालीची लोकप्रियता मिळवली आणि प्रेक्षकांसाठी ते ठरले 'भारत कुमार'.
60 च्या दशकात त्यांनी हिंदी कलाविश्वामध्ये पदार्पण केलं आणि 70-80 च्या दशकात त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. मनोज कुमार यांच्या लोकप्रिय कलाकृतींमध्ये 'हरियाली और रास्ता', 'वो कौन थी...', 'हिमालय की गोद मे', 'दो बदन', 'उपकार', 'पत्थर के सनम', 'नील कमल', 'पूरब और पश्चिम','रोटी कपडा और मकान', 'क्रांती' या चित्रपटांचा समावेश आहे.