Vivek Oberoi Net Worth : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनं 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला आपल्या करिअरची सुरूवात केली. विवेक ओबेरॉय आता केवळ अभिनेता नाही, तर एक मोठा उद्योजकसुद्धा झाला आहे. जरी त्याला चित्रपटांमधून फारसा पैसा मिळाला नाही, तरी व्यवसायात यश मिळवून आज त्याची एकूण संपत्ती तब्बल 1200 कोटी रुपये इतकी झाली आहे.
आता विवेक दुबईमध्ये राहतो आणि तिथूनच आपली रिअल इस्टेट कंपनी चालवतो. नुकत्याच एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की तो कोविडच्या काळात काही काळासाठी दुबईला गेला होता, पण नंतर त्याच्या कुटुंबानं कायमच तिथे राहण्याचा निर्णय घेतला.
त्यानं सांगितलं, 'मी सुरुवातीला काही काळासाठी आलो होतो, पण मला इथले अनुभव खूप आवडले. मग मी कुटुंबाला विचारलं आणि आम्ही घरात मतदान केलं. सर्वांनी दुबईतच राहण्याचं ठरवलं. इथे आपल्याला आपल असल्याचं वाटतं. भारत अगदी जवळ आहे, आम्ही सुट्ट्यांमध्ये भारतात जातो, पण आता इथेच घरासारखं वाटतं.'
विवेकनं दुबईच्या सकारात्मक आणि चांगल्या वातावरणाची खूप स्तुती केली. तो म्हणाला, 'इथे तुमच्याकडे पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त स्थानिक कायदे, संस्कृती आणि लोकांचा सन्मान करा, म्हणजे कोणतीच अडचण येत नाही. ही अशी जागा आहे जिथे तुम्ही कोणत्याही गोष्टीची चिंता न करता राहू शकता आणि भरभराट करू शकता.'
फॉर्च्यून इंडिया सोबतच्या मुलाखतीत विवेकनं सांगितलं की त्याची लग्झरी रिअल इस्टेट कंपनी यूएईमध्ये जवळपास 7 अब्ज डॉलर (सुमारे 58,000 कोटी ) ची मालमत्ता विकसित करत आहे आणि या कंपनीवर शून्य कर्ज आहे, अर्थात ही कंपनी zero-debt कंपनी आहे.
याशिवाय, त्याने 'सोलिटेरियो' नावाच्या लॅब-ग्रो डायमंड व्यवसायात गुंतवणूक केली आहे, ज्यातून मागील आर्थिक वर्षात 95 ते 100 कोटी रुपये कमावले. त्याचबरोबर, त्याने 30 दशलक्ष पाउंड (जवळपास 300 कोटी) किंमतीच्या एका प्रीमियम जिन ब्रँड मध्ये गुंतवणूक केली असून, त्यात त्याचा 21% हिस्सा आहे.
फ्रँचाइजी इंडियाच्या एका व्हिडिओमध्ये विवेकनं सांगितलं की तो अशा व्यवसायाचा भाग आहे जो विद्यार्थ्यांना फीस फायनान्सिंग करतो (non-collateralized). ही कंपनी इतकी मोठी झाली की ती आज जवळपास 3400 कोटींची आहे.
हेही वाचा : कोरियोग्राफर गीता कपूरनं सोडलं बॉलिवूड; म्हणाली, 'कमबॅक करणार नाही कारण...'
त्यानं सांगितलं की, 'आम्ही 12000 शाळा, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचलो आणि पुढे जाऊन 45 लाख विद्यार्थ्यांशी थेट संबंध प्रस्थापित केला. हाच डेटा आमच्यासाठी खूप मोठा.'