Marathi News> मनोरंजन
Advertisement

'माझे आई-वडील काही म्हणत नाहीत तर तुम्ही कोण?', जेव्हा करिश्मा कपूरने काका ऋषी कपूर यांना सुनावलं, 'मी काय साडी नेसून...'

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) एका मुलाखतीत खुलासा केला होता की, प्रेम कैदी (Prem Qaidi) चित्रपटात स्विमिंग सूट घातल्याने काका ऋषी कपूर (Rishi Kapoor) नाराज झाले होते.   

'माझे आई-वडील काही म्हणत नाहीत तर तुम्ही कोण?', जेव्हा करिश्मा कपूरने काका ऋषी कपूर यांना सुनावलं, 'मी काय साडी नेसून...'

बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर ज्या अभिनेत्रींचा दबदबा होता त्यामध्ये करिश्मा कपूरचंही प्रामुख्याने नाव घेतलं जातं. कपूर कुटुंबात एकीकडे महिला संसारात स्वत:ला वाहून घेत असताना करिश्मा जणू काही बंड पुकारत मोठ्या पडद्यावर आली होती. करिश्मा कपूरच्या आधी कपूर कुटुंबातील कोणतीही महिला बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात उतरली नव्हती. तर दुसरीकडे करिश्माची आई बबिता, रणबीरची आई नितू कपूर यांनी कपूर कुटुंबात लग्न झाल्यानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला होता. त्यामुळेच जेव्हा करिश्मा कपूर बॉलिवूडमध्ये आली, तेव्हा तिची चर्चा होणं साहजिक होतं. करिश्मानंतर करिनाही बॉलिवूडमध्ये आली आणि त्या दोघी यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत आहेत. 

करिश्मा कपूरने 1991 मध्ये 'प्रेम कैदी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी ती फक्त 15 वर्षांची होती. चित्रपटातील एका सीनमध्ये तिने स्विमिंग सूट घातला होता. तिचं हे स्विमिंग सूट घालणं तिचे काका ऋषी कपूर यांना रुचलं नव्हतं. यावर करिश्माने एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं होतं. तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मुलाखतीत करिश्माला ऋषी कपूर यांनी तिच्या स्विमसूटवर नाराजी जाहीर केल्याचं सांगण्यात आलं. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली की, "जेव्हा लोकांनी प्रेम कैदी चित्रपट पाहिला आणि थिएटरच्या बाहेर आले तेव्हा कोणाच्याही लक्षात तो स्विमसूट नव्हता. प्रत्येकजण चित्रपटातील माझ्या अभिनयाबद्दल बोलत होता. खरं सागायचं तर मला माझ्या आई वडिलांना काय वाटतं आणि ते काय विचारतात याचा फरक पडतो. जर त्यांचा काही आक्षेप नसेल तर इतक कोणाला असण्याचं कारण काय? मी काय करावं अशी लोकांची अपेक्षा आहे? साडी नेसून स्विमिंग पूलमध्ये उतरावं का? किती मूर्खपणा आहे. स्विमसूट घालण्यात चुकीचं काय? इतर मुली घालत नाहीत का?".

त्याच मुलाखतीदरम्यान करिश्माने तिलाच सर्व प्रसिद्धी मिळत असल्याने तिचा सहकलाकार हरीश कुमार नाराज असल्याच्या वृत्तांबद्दलही खुलासा केला "प्रेम कैदीचे निर्माते श्री. डी. रामा नायडू यांनी स्वतः म्हटलं होतं की करिश्मा कपूर ही प्रेम कैदीचा नायक आणि नायिका होती. जर त्यांनी असं म्हटले तर ती माझी चूक आहे का? मला सर्व श्रेय मिळाले तर ती माझी चूक आहे का? प्रेम कैदी हा सर्व टीमने घेतलेल्या कठोर मेहनतीचा परिणाम आहे. हरीश नाराज का असावा? जर माझे जास्त कौतुक झाले असेल तर मी काय करू शकते? हो, मी म्हणाले होते की प्रेम कैदी माझ्यामुळे हिट झाला. पण ते अगदी हलक्याफुलक्या क्षणी झाले. इंडस्ट्रीतील इतर सर्वजण मला हेच सांगत होते. मग काय चूक आहे?", अशी विचारणा तिने केली होती. 

करिश्मा कपूर आणि हरीश कुमार यांच्याव्यतिरिक्त, प्रेम कैदीमध्ये दलिप ताहिल, परेश रावल आणि असरानी यांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. मुरली मोहना राव दिग्दर्शित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर करिश्माने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.

Read More