Kamal Haasan film: सध्या सोशल मीडियावर 'सैयारा' चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. जिथे जाईल तिथे फक्त याच चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर चित्रपट पाहून अनेकजण रडतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, 'सैयारा' पेक्षाही एक चित्रपट असा होता, जो पाहून अनेकांनी आत्महत्या केली होती.
1981 साली प्रदर्शित झालेला 'एक दुजे के लिए' हा हिंदी चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक भावनिक आणि क्रांतिकारी टप्पा ठरला. कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम केला होता. पण या परिणामाचा एक दुःखद पैलूही समोर आला होता. तो म्हणजे चित्रपट पाहून अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या.
काय होती या चित्रपटाची कथा?
‘एक दुजे के लिए’ ही कथा ही वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीतील दोन तरुण-तरुणींची होती. जी दक्षिण भारतीय वसंत कमल हासन आणि उत्तर भारतीय सपना रती अग्निहोत्री. त्यांचं प्रेम त्यांच्या कुटुंबांना मान्य नसतं. अखेर विरोध, मारहाण, जबरदस्ती याच्या पार्श्वभूमीवर दोघंही जगण्याला नकार देतात आणि आत्महत्या करतात.
हा चित्रपट इतका भावनिक होता की, या चित्रपटाच्या शेवटी नायक आणि नायिका प्रेमात पराभूत होऊन स्वतःचा अंत करतात. या दुःखद शेवटाचा अनेक तरुणांवर खोल परिणाम झाला. ज्यामुळे हा चित्रपट पाहून अनेक तरुण-तरुणींनी आत्महत्या केली.
त्याच काळात असलेली तरुण मंडळी आणि जोडपी जाती-धर्माच्या अडथळ्यामुळे प्रेमात अपयशी ठरत होती. त्यांना या चित्रपटात आपली कथा दिसली. त्यामुळे काहींनी ही कथा आपली मानून टोकाचे पाऊल उचलले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांत 10 हून अधिक आत्महत्यांच्या घटना देशभरात घडल्याचे समोर आले होते. ज्या या चित्रपटाच्या प्रेरणेने झाल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
सामाजिक संघटनांकडून चित्रपटावर प्रश्न उपस्थित
त्या काळात आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमप्रकरणांना समाजात मान्यता नव्हती. घरच्यांचा विरोध, सामाजिक दबाव यामुळे अनेक जोडप्यांच्या प्रेमकथांचा शेवट दु:खद होत असे. ‘एक दुजे के लिए’ हा चित्रपट म्हणजे अशा वास्तवाचं सिनेमॅटिक रूप होतं. ज्यात प्रेमापेक्षा जात, भाषा आणि प्रतिष्ठा मोठी मानली गेली होती.
या घटनेनंतर अनेक सामाजिक संघटनांनी चित्रपटांच्या प्रभावावर प्रश्न उपस्थित केले. तथापि, या चित्रपटाने समाजाला एक आरसा दाखवण्याचं काम केलं. ज्यामुळे प्रेमासाठी लढणाऱ्या पिढीच्या वेदना आणि वेदनांचा शेवट आत्महत्येत का होतो यावर नंतर चर्चा सुरू झाली.