'राजा साब' टीझरने वाढवली उत्सुकता
2025 मध्ये प्रभास एक आगळावेगळा लूक घेऊन 'राजा साब'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच आलेल्या टीझरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद तर मिळाला आहेच. पण हा चित्रपट केवळ प्रभाससाठीच नव्हे तर चाहत्यांसाठीही एक वेगळा अनुभव ठरेल. या आधीही हॉरर-कॉमेडी पठडीतील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. त्यामुळे प्रभासच्या 'राजा साब'साठीही ही एक मोठी कसोटी असेल.
हॉरर-कॉमेडीमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2'. या चित्रपटाने तब्बल 884.45 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला होता. या यशामुळे 'स्त्री 2' हा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा हॉरर चित्रपट ठरला आहे. त्याचवेळी 'भूल भुलैया 3' आणि कमी बजेटमध्ये बनलेला 'मुंज्या' यांसारख्या चित्रपटांनीही दमदार कामगिरी केली आहे. मात्र प्रभाससारख्या पॅन-इंडिया सुपरस्टारकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 'बाहुबली'पासून सुरु झालेली त्याची घोडदौड 'साहो', 'आदिपुरुष' आणि 'कन्नप्पा' पर्यंत पोहोचली आहे. 'राजा साब'मध्ये तो पुन्हा एकदा स्वतःला एका नव्या भूमिकेत सादर करत आहे. ज्यामुळे चाहत्यांची अपेक्षा प्रचंड वाढली आहे.
प्रभासचे मागील हिट चित्रपट
'बाहुबली'नंतर प्रभासच्या चित्रपटांनी चांगली कमाई केली असली तरी त्यांचे बजेटही तितकंच भव्य आहे. त्यामुळे प्रेक्षकांची अपेक्षा असते की, प्रत्येक चित्रपट 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल. त्याच्या दोन चित्रपटांनी आधीच 1000 कोटींचा आकडा पार केला आहे, तर अनेक चित्रपटांनी 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
संजय दत्त- एक जबरदस्त सरप्राइज पॅकेज
या चित्रपटात संजय दत्त एक सरप्राइझ पॅकेज म्हणून पाहायला मिळणार आहे. तो या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार असून, प्रभासला थेट टक्कर देताना दिसेल. टीझरमधून त्याच्या पात्राला मिळालेला प्रतिसाद पाहता, त्याची उपस्थितीही चित्रपटाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार हे निश्चित आहे. KGF मध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर, दक्षिणेतील प्रेक्षकांमध्येही त्याची लोकप्रियता वाढली आहे.
'राजा साब'च्या टिझरला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः प्रभासच्या भूमिकेइतकंच संजय दत्तच्या व्यक्तिरेखेचीही चर्चा रंगत आहे. ही जोडी एकत्र स्क्रीनवर धमाका करणार, असा अंदाज लावला जात आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.