Aditya Pancholi Extramarital Affairs: अभिनेता आदित्य पंचोलीची पत्नी अभिनेत्री जरीना वहाबने त्यांच्या लग्नाबद्दल एक रंजक विधान केलं आहे. लग्नानंतरचा आमच्या संसाराचा प्रवास हा चढ उतारांनी भरलेला होता असं सांगतानाच जरीनाने पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दलही भाष्य केलं आहे. आदित्यच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत, मात्र त्याचा आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असं जरीनाने स्पष्टपणे सांगितलं. नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांचा संसारावर परिणाम न होण्याच्या कारणासंदर्भात बोलताना जरीनाने, आदित्य घराबाहेर काय करतो याची मला पर्वा नाही, असं बेधकड विधान एका मुलाखतीत केलं आहे.
1990 च्या दशकात आदित्य पांचोलीचे अभिनेत्री पूजा बेदीसोबत आणि अलीकडेच कंगना राणौतसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत, जरीनाला पतीच्या याच विवाहबाह्यसंबंधांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मीडियामध्ये आदित्यच्या अफेअर्सबद्दल वाचण्यानंतर त्याचा तुमच्यावर परिणाम होतो का? असा सवाल जरीनाला विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना जरीनाने, "मी जेव्हा प्रेमसंबंधांच्या अफवा वाचायचे तेव्हा मला थोडे वाईट वाटायचे, पण नंतर मी त्यावर हसत असे. तो बाहेर काय करतो याची मला पर्वा नाही, जेव्हा तो घरी येतो तेव्हा तो एक उत्तम पिता आणि पती आहे आणि माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. जर तो त्याचे प्रेमसंबंध घरी घेऊन आला असता तर मला वाईट वाटले असते. जर मी या सर्व गोष्टींना खूप गांभीर्याने घेतले आणि भांडले तर मला त्रास होईल. मला त्रास नको आहे, मी स्वतःवर फार प्रेम करते," असं म्हटलं.
लोक असे गृहीत धरतात की मी माझ्या या नात्यामुळे सामाधानी नसून त्यामुळेच नाखूष आहे. मात्र असं गृहित धरणं चुकीचं असल्याचं जरीनाने म्हटलं आहे. "लोकांना वाटते की मी खूप तणावात आहे. ते फक्त असे गृहीत धरतात की 'ती नाखूष असावी कारण आदित्य वेगवेगळ्या मुलींकडे पाहतो.' असं कोणीही म्हणत नाही, 'ये लडकी देख रही है इनको," असं म्हणत जरीनाने पतीची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं.
जरीना आणि आदित्य यांचे लग्न 1986 साली झाले. सूरज पंचोली आणि सना पंचोली अशी दोन मुलं त्यांना असून दोघेही मनोरंजनसृष्टीमध्ये काम करतात. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला आदित्य कंगना राणौतसोबत राहत असल्याची अफवा पसरली होती. ही गोष्ट अभिनेत्याने कबूल केली होती. कंगनासोबतचे त्याचे प्रेमसंबंध संपल्यानंतर त्याने जरीनासोबत समेट केल्याच्या बातम्याही समोर आल्या.