Zee Marathi New Serial: झी मराठीवर लवकरच एक नवी आणि सस्पेन्सने भरलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे 'तारिणी'. ही कथा आहे एका धाडसी तरुणीची – तारिणी बेलसरे. जिला आपल्या आईवर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा आहे आणि सत्य जगासमोर आणायचं आहे.
काय आहे मालिकेची कथा?
तारिणी ही मुंबईत राहणारी एक तरुणी आहे. तिची आई पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल होती, परंतु तिच्यावर लाच घेण्याचे खोटे आरोप लावले गेले. त्या आरोपांच्या दबावामुळे तिने आत्महत्या केल्याचं भासवलं गेलं. तारिणीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि सावत्र आईने तिच्या आईचा उल्लेखही घरात न करण्याचा आदेश दिला.
पण तारिणीला खात्री आहे की तिची आई कधीच चुकीचं वागू शकत नाही. हेच सत्य जगासमोर आणण्यासाठी आणि खऱ्या गुन्हेगाराला बेड्या घालण्यासाठी ती पोलीस दलात भरती होते. तिच्या सोबत आहे केदार नावाचा एक हुशार आणि कणखर तरुण असतो. ज्याचा निशाणा कधीच चुकत नाही. त्यालाही स्वतःच्या वडिलांचा शोध घ्यायचा असतो. जे त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेले असतात. दोघांमध्ये एक अनोखा बंध आहे. साथ, विश्वास आणि केदारच्या मनात असलेलं अप्रकट प्रेम.
खांडेकरांच्या घरात शिरकाव
एका निर्णायक टप्प्यावर तारिणी आणि केदार मीडियाच्या विश्वात मोठं नाव असलेल्या खांडेकर कुटुंबाच्या घरात पोहोचतात. त्यामागचं कारण काय? खांडेकरांचं घर आणि तारिणीच्या आईवरील आरोप यांचा काही संबंध आहे का? तिथेच मिळणार आहे का खऱ्या गुन्हेगाराचा पत्ता? आणि या प्रवासात केदार आणि तारिणीचं नातं बदलून जाईल का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
पाहा प्रोमो
सध्या या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रेक्षक या मालिकेबाबत खूप उत्सुक आहेत. मात्र, जर ही मालिका सुरु होत असेल तर झी मराठीवरील कोणती मालिका आता निरोप घेणार आहे असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.