Zee News Exclusive: अनेक वेब सिरीज आणि रिअॅलिटी शोमध्ये काम करणारी अभिनेत्री खुशी मुखर्जी सध्या तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत आहे. तिची फॅशन पाहिल्यानंतर अनेकांनी अश्लील कमेंट्स करून तिला ट्रोल केलं आहे. बऱ्याच जणांनी तिच्या या अश्लील फॅशनसाठी तिची तुलना थेट उर्फी जावेदशी केली आहे. अनेकजण म्हणत आहेत की खुशी उर्फी जावेदची कॉपी करण्याचा प्रयत्न करतेय. या सर्व प्रश्नासंदर्भात खुशीने 'झी न्यूज'ला खास मुलाखत दिली. यादरम्यान व्हायरल गर्ल म्हणून चर्चेत असलेल्या या अभिनेत्रीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ती नेमकं काय म्हणालीये पाहूयात...
'मी यापूर्वीच अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, मी अभिनेत्री असण्यासोबतच फॅशन इन्फ्लुएंसरही आहे. मला जे कपडे घालायचे आहेत ते मी घालेन. मी सलवार आणि जीन्स देखील घालते. प्रत्येकजण सामान्य पद्धतीने जीन्स घालतो. पण ती जीन्स वेगळ्या पद्धतीने घालणे ही फॅशन आहे. प्रत्येकजण समोरून फाटलेली जीन्स घालतो. त्याची फॅशन सुमारे 10 वर्षांपूर्वी सुरू झाली असावी. त्यावेळी बरेच लोक त्याला 'छपरी' म्हणून हिणवत असत. मी ती गोष्ट पुन्हा केली नाही. मी फक्त पुढून ऐवजी मागून जीन्स कापली. तो एक ट्रेंड झाला. माझ्या लबूबू डॉलसोबत मी केलेल्या अलिकडच्या लूकमध्येही, मी जीन्स समोरून पूर्णपणे कापली आणि त्याचे दोन पट्टे काढून टाकले आणि त्यांना जोडले. म्हणजेच कपड्याच्या एका बेसिक तुकड्यात बदल करून, मी त्याला एक नवीन लूक देते. हा माझ्या फॅशनचा स्टाइल मंत्र आहे,' असं खुशीने तिच्या वादग्रस्त फॅशन सेन्सबद्दल स्पष्ट केलं.
याच मुलाखतीमध्ये खुशीला, तुम्ही कधी काम शोधण्यासाठी गेला आणि तुमच्यासोबत काहीतरी विचित्र घटना घडली असा एखादा प्रसंग तुम्ही आमच्यासोबत शेअर करु शकता का? असा सवालही विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना खुशीने एकदा एका निर्मात्याने तिला विकण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला.
"एकदा मी हैदराबादला काम शोधण्यासंदर्भात गेले होते. तिथल्या कास्टिंग डायरेक्टरने मला एका निर्मात्याला विकण्याचा प्रयत्न केला. त्याने मला सांगितले की तुला नक्की या प्रोजेक्टसाठी साइन केले जाईल. मग त्याने माझी निर्मात्यासोबत बैठक आयोजित केली. त्याने त्याच्याकडून एक लाख रुपये घेतले. मात्र मी जेव्हा निर्मात्याला भेटले तेव्हा त्याने मला सांगितले की मला कळवण्यात आलं आहे की तू माझ्यासोबत बेड शेअर करशील. त्यावेळी ते वाक्य ऐकून मी त्याला सांगितले की मला या गोष्टींबद्दल काहीही माहिती नाही. मला वाटतं काहीतरी चुकीची माहिती देण्यात आली आहे. तो निर्माता चांगला होता म्हणून त्याने मला म्हटले की ठीक आहे, तू जा! त्यानेच माझे मुंबईचे तिकीट बुक केले आणि मला मुंबईला परत पाठवले. काही लोकांनी मला काहीही न बोलता विकले आणि काही लोकांनी माझे शोषण करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत,' असं खुशी म्हणाली.