मुलांमध्ये किडनीच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत परंतु त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हे लक्षात असू द्या की वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक काळजी हे मुलांचे जीवनमान सुधारू शकते. पालकांनो, मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. यशस्वी परिणामांसाठी वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.
किडनीचे आजार केवळ प्रौढांमध्येच नाहीत तर मुलांमध्येही सामान्य आहेत. जन्मजात विकारांपासून ते संसर्ग आणि जीवनशैलीशी संबंधित समस्यांपर्यंत, मुलांमध्ये किडनीच्या आजारामुळे त्यांची वाढ, एकूण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. काही किडनीच्या समस्या तात्पुरत्या आणि उपचार करण्यायोग्य असतात, तर काही वेळीच आढळून न आल्यास क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) होऊ शकतात. मुलांमध्ये किडनीचा आजार जन्मजात विकृती, संसर्ग, रोगप्रतिकारक विकार आणि अनुवांशिक परिस्थितींमुळे होऊ शकतो. डिहायड्रेशन, उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेह यासारखे इतर विविध घटक देखील किडनीच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात, अशी माहिती डॉ. मधुरा फडणीस खरडकर, चाईल्ड नेफ्रोलॉजिस्ट यांनी दिली आहे.
मूत्रमार्गाचे संसर्ग (UTIs): उपचार न केल्यास वारंवार होणारे युटीआय संसर्ग हे मुलाच्या मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम करू शकतात.
नेफ्रोटिक सिंड्रोम : जेव्हा लघवीतून प्रथिने जास्त प्रमाणात जातात ज्यामुळे सूज येते तेव्हा मुलांमध्ये हे दिसून येते.
जन्मजात मूत्रपिंडासंबंधी विकृती: काही मुले त्यांच्या मूत्रपिंडात संरचनात्मक विकृतींसह जन्माला येतात. म्हणून, मूत्रपिंड आवश्यकतेनुसार कार्य करू शकत नाहीत.
दीर्घकालीन मूत्रपिंड रोग (CKD): यामुळे मूत्रपिंडाचे कार्य कमी होते ज्यासाठी दीर्घकालीन व्यवस्थापन आवश्यक असू शकते.
मूत्रपिंडातील खडे : अनेक मुलांना निर्जलीकरणामुळे मूत्रपिंडाच्या खड्यांचा त्रास होतो.
· चेहरा, हाता-पायांवर सूज
· वारंवार लघवीची भावना किंवा वेदनादायक लघवी
· लघवीवाटे रक्त
· उच्च रक्तदाब
· थकवा किंवा अशक्तपणा
· भूक मंदावणे आणि वजन कमी होणे
जर पालकांना वारंवार अंथरुणावर ओले, लघवीत असामान्य बदल आणि लघवीत रक्त येणे अशी लक्षणे दिसली तर त्यांनी विलंब न करता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
पुरेसे हायड्रेशन : पालकांनी मुलांना दररोज किमान २-३ लिटर पाणी पिण्यास प्रवृत्त करावे जेणेकरून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि मूत्रपिंडात खडे तयार होणार नाही. मुलाचे मूत्रपिंड निरोगी राहील याची खात्री करा.
निरोगी आहाराच्या सवयीचे पालन करा : आहारातील मीठाचे प्रमाण आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन कमी करणे व संतुलित आहाराचे सेवन करणे हे मूत्रपिंडाच्या कार्यासाठी आणि मुलाच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मुलांनी जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ,तेलकट, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि शर्करायुक्त पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
मूत्र आरोग्याचे निरीक्षण करा : मुलांना योग्य स्वच्छतेच्या सवयी शिकवा आणि पोटदुखी, लघवीला त्रास होणे यासारख्या मूत्र संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांसाठी वैद्यकीय मदत घ्या.
नियमित आरोग्य तपासणी : नियमित लघवी आणि रक्त चाचण्या मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या समस्या वेळीच ओळखण्यास मदत करू शकतात जेणेकरून त्वरित वैद्यकीय उपचार करता येतील.
शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्या : नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण आणि एकूण मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. म्हणूनच, पालकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की आपल्या मुलांनी दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा.