जगभरातील लाखो पुरुषांसाठी टक्कल पडण्याच्या समस्या गंभीर होत चालली आहे. खरं तर पुरुष असो किंवा महिला बदलेल्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये केस गळतीची समस्या वाढत चालली आहे. पण आता केस गळतीची समस्या आणि टक्कल पासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. कारण तुमच्यासाठी दिलासादायक बातमी घेऊ आम्ही आलो आहोत. स्पॅनिश शास्त्रज्ञांनी एक नवीन उपचारपद्धती विकसित केली आहे जी केवळ केस गळणे थांबवत नाही तर केस पुन्हा वाढण्यास फायदेशीर आहे. 2029 पर्यंत ही उपचारपद्धती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे, असं सांगण्यात येत आहे.
माद्रिदमधील क्लिनिको सॅन कार्लोस रुग्णालयातील शास्त्रज्ञांनी एका अभ्यासादरम्यान नर आणि मादी उंदरांवर स्टेम सेल-आधारित तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर करुन हे नवीन संशोधन केलं आहे. या प्रयोगात, शास्त्रज्ञांनी असे निरीक्षण केले की ज्या उंदरांना स्टेम सेल्स आणि एडेनोसिन ट्रायफॉस्फेट (ATP) यांचे मिश्रण इंजेक्शन देण्यात आले होते त्यांचे केस तीन आठवड्यांत पुन्हा वाढण्यास मदत झाली. काही प्रकरणांमध्ये, केसांची जाडी आणि घनता पूर्वीपेक्षाही चांगली दिसून आली आहे.
या संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. एडुआर्डो लोपेझ ब्रेन म्हणाले की, आम्ही स्टेम सेल्सची प्रजनन क्षमता आणि एटीपीची ऊर्जा एकत्रित करून ही उपचारपद्धती विकसित करण्यात यशस्वी झालो आहोत. ज्यामुळे केसांच्या कूपांची पुनर्प्राप्ती होते आणि नवीन केस वाढण्यास मदत मिळते.
आपल्या डोक्यावरील हजारो केस लहान छिद्रांमधून म्हणजेच केसांच्या कूपांमधून वाढतात. जेव्हा हे कूप आकुंचन पावू लागतात आणि पोषण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तेव्हा केस पातळ होतात आणि तुटू लागतात. तर पुढे जाऊन अखेर नवीन केस वाढणे थांबून जातं. या प्रक्रियेसाठी डीएचटी (डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन) हार्मोन आणि अनुवांशिक घटक प्रामुख्याने जबाबदार मानले गेले आहेत.
अभ्यासात, उंदरांना प्रथम केस गळण्यासाठी DHT देण्यात आले. नंतर अर्ध्या उंदरांना स्टेम सेल्स आणि ATP चे मिश्रण इंजेक्शन देण्यात आले आणि उर्वरित उंदरांना काहीही देण्यात आले नाही. 21 दिवसांनंतर, उपचार घेतलेल्या उंदरांचे केस एकतर पूर्णपणे पुन्हा वाढले किंवा मोठ्या प्रमाणात वाढल्याच पाहिला मिळाले.
संशोधकांचा असा विश्वास आहे की ही तंत्र मानवांवरही काम करू शकतं. पुढील टप्प्यात मानवी चाचण्या सुरू केल्या जातील. ही उपचारपद्धती मेसोथेरपीद्वारे मानवांना दिली जाईल, म्हणजेच हे द्रावण इंजेक्शनद्वारे थेट टाळूमध्ये इंजेक्ट केले जाईल. ही प्रक्रिया केवळ प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिकाद्वारेच केली जाऊ शकते. त्यामुळे, ते औषध म्हणून बाजारात उपलब्ध होणार नाही, परंतु डॉक्टरांकडून उपचार म्हणून घ्यावे लागेल.
या उपचाराची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. डॉ. ब्रॅन म्हणतात की भविष्यात चाचण्या किती यशस्वी होतात आणि वापरासाठी कोणत्या पातळीवर मान्यता मिळते यावर त्याची किंमत अवलंबून असेल. पण हे उपचार सध्याच्या केस प्रत्यारोपण किंवा स्थानिक उपचारांपेक्षा स्वस्त आणि अधिक प्रभावी असतील अशी अपेक्षा आहे.
केस गळणे हा जीवघेणा आजार नसला तरी, त्याचा आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होताना पाहिला मिळतो. विशेषतः तरुण पुरुषांमध्ये, यामुळे चिंता आणि नैराश्य देखील येऊ शकतं. म्हणूनच शास्त्रज्ञ या उपचारपद्धतीला जीवनाच्या गुणवत्तेशी जोडून पाहत आहेत.
मनोरंजक गोष्ट म्हणजे, अलिकडच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की महिलांना टक्कल पडलेले पुरुष देखील आकर्षक वाटतात. या सर्वेक्षणात, 2000 महिलांना त्यांच्या आवडींबद्दल विचारण्यात आले, ज्यामध्ये 'ठळक डोके' हे स्नायूंच्या शरीरानंतर सर्वात आकर्षक वैशिष्ट्य असल्याचे आढळून आले. कदाचित म्हणूनच आज जेसन स्टॅथम, ड्वेन जॉन्सन आणि विन डिझेलसारखे स्टार इतके लोकप्रिय आहेत.
या क्षेत्रात इतर प्रयोगही सुरू आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत स्टेम सेल्सपासून स्किन ऑर्गेनॉइड्स तयार केले आहेत जे केस वाढवू शकतात. जपानी शास्त्रज्ञांनी दोन वनस्पतींपासून (फेलोडेंड्रॉनची साल आणि चिनपी (वाळलेल्या संत्र्याची साल) नैसर्गिक केसांच्या वाढीच्या पर्यायावर काम केले आहे. याशिवाय, शरीरात असलेली नैसर्गिक साखर 2dDR देखील केस वाढवण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)