Lifestyle News : विज्ञान आणि तंत्रज्ञान अतिशय झपाट्यानं पुढं जात असताना आणि सर्वतोपरी जग आर्थिक प्रगती करत असतानाच एक मोठा सज्ञान वर्ग अनेक आव्हानांचा सामना करताना दिसत आहे. हे आव्हान येत्या काळात आणखी गंभीर झाल्यास जगभरातील युवा पिढीसर मध्यमवयीन पिढीसुद्धा एका मोठ्या संकटात दिसत आहे.
National Bureau of Economic Research च्या वतीनं जगभरात हे अनोखं निरीक्षण केलं असून Jean Twenge आणि David Blanchflower यांनी जवळपास 11 निरीक्षणांचा आढावा घेत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, न्यूझीलंड, युके आणि युएसए या देशांमधील परिस्थिती अधोरेखित करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. वयानुरूप प्रत्येकासाठी आनंदाची परिभाषा कशी बदलते आणि या आनंदीपणाचं प्रमाण कसं घटत चाललं आहे हे या निरीक्षणातून स्पष्ट झालं.
मानसोपचारतज्ज्ञांनी कैक वर्षांपासून आनंद किंवा हास्य U-shaped curve सिद्धांतानुसार ग्राह्य धरली. पण, मध्यमवयीन वर्गामध्ये मात्र हाच आनंदीपणा त्यांच्या जीवनातून दूर जाताना दिसत आहे. निखळ आनंदाची परिभाषा सध्या अतिशय झपाट्यानं बदलत असून, वयानुरूप हा आनंद बदलत आहे. जीवनाविषयी समाधानी असण्याचं प्रमाण मध्यमवयीन पिढीमज्ये कमी झालं असून, उतारवयाकडे असणाऱ्यांकडे मात्र ही भावना अधिक प्रमाणात दिसत आहे. कोविडनंतरच्या काळात हे प्रमाण तुलनेनं वाढताना दिसलं.
आनंदी किंव समाधानकारक असण्याचं प्रमाण मोठ्या फरकानं घटत असल्यामुळं आता जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. वरील देशांव्यतिरिक्त जगभरातही तरुण आणि मध्यमवयीन पिढीमध्ये नैराश्य, ताणतणाव आणि स्वत:ला इजा पोहोचवण्याची भावना वाढताना दिसत असून हे प्रमाण सध्या गंभीर वळणावर पोहोचलं आहे. कैक पाश्चिमात्य देशांतील नागरिक मोठ्या प्रमाणात नैराश्यासाठी वैद्यकिय उपचारांचा आधार घेत आहेत. ज्यामुळं त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
काय आहेत आनंदी भाव कमी होण्याची कारणं?
सोशल मीडियाचा वाढता वापर, आर्थिक अस्थैर्य, जागतिक स्तरावरील आव्हानं, साथीचे रोग ही व्यक्तीच्या जीवनात आनंदी भावना कमी करण्यामागची मुख्य कारणं ठरत असून समाजिक स्तरांवर एकमेकांशी कमी होत जाणारा संपर्क आणि संवाद यामुळंसुद्धा एक मोठा वर्ग आनंदापासून वंचित राहत आहे.
ही समस्या सध्या अतिशय झपाट्यानं वाढत असल्यानं मुळातच मानसिक आरोग्याविषयी जागरुकता केली जाण्याची गरज प्रकर्षानं डोकं वर काढत आहे. भविष्यातील पिढ्यांना एक स्थिर आणि समाधानकारक आयुष्य देण्यासाठी सध्याच्या पिढ्यांनीच आपल्या विचारसणीपासून जीवनशैलीपर्यंत केलेले सकारात्मक बदल हे सहज शक्य करू शकतील असंच जाणकारांचं मत.
(वरील माहिती निरीक्षणावर आधारित असून, झी 24 तास त्याची खाजरजमा करत नाही. मानसिक आरोग्यविषय समस्यांसाठी तज्ज्ञांचा सल्ल अवश्य घ्या.)