Marathi News> हेल्थ
Advertisement

48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस

'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस

मुंबई : 'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टिस्ट्युड ऑफ वायरॉलॉजीने 3 नमुन्यांची तपासणी केल्यानंतर 'निपाह' व्हायरस  असल्याची घोषणा केली आहे. 

कोठे सापडला पहिला व्हायरस 

1998 साली मलेशिया आणि सिंगापूरमध्ये हा व्हायरस आढळला. निपाह हा व्हायरस मनुष्य आणि जानवरांमध्ये एक गंभीर इंफेक्शन पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतो. खजुराची शेती करणार्‍यांना या व्हायरसचा धोका अधिक आहे. संसर्ग झालेल्या वटवाघुळांंनी खाल्लेल्या खजुराच्या किंवा फळाच्या संपर्कात आल्याने हे इंफेक्शन पसरत आहे.  2004 साली बांग्लादेशमध्ये अनेक लोक या व्हायरसच्या विळख्यात आली होती. हे इंफेक्शन फ्रुट बॅट्स ( वटवाघुळाचा प्रकार) द्वारा पसरत आहे. निपाह व्हायरस हा संसर्ग झालेल्या माणसामधून, डुक्करांमधून किंवा वटवाघुळातूनही पसरू शकतो. 

लक्षणं काय ?  

निपाह व्हायरस हा हवेतून पसरत नाही मात्र हा थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो. 

निपाह व्हायरस हा मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप (मेंंदुत ताप), थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण आढळतात. 

लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. 

अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासाशी निगडीत आणि हृद्याच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचं निदर्शनास आले आहे. 

ताप, थकवा, शुद्ध हरपणं, चक्कर येणं. उलट्या होणं, मळमळणं, अस्वस्थ वाटणं ही लक्षणं सुरूवातीला 7-10 दिवस आढळतात. 

सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे  तपासून पाहणं अत्यावश्यक आहे.  

कशी घ्याल काळजी  ? 

निपाह व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सध्या कोणतेही ठोस औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही. 

पडलेली, अर्धवट खाल्लेली फळं, प्रामुख्याने खजुराचं फळं खाणं टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो. 

संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणं टाळा. 

वैद्यकीय मदत करणार्‍या व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. सोबतच ग्लोव्ह्स, मास्क घालून रूग्णांची तपासणी करावी.  

मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करावी. तुम्हांला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणं आवश्यक आहे.  

Read More