Marathi News> हेल्थ
Advertisement

दररोज एक पेग दारुमुळे कॅन्सरचा धोका

एकच प्याला जिवावर घाला...

दररोज एक पेग दारुमुळे कॅन्सरचा धोका

रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : रोज एक पेग दारु प्या आणि स्वस्थ राहा असं सांगणारे अनेक स्वयंघोषित तत्वज्ञ तुम्हाला जागोजागी भेटतील. पण एक पेगचं तत्वज्ञान काही खरं नाही. रोज एक पेग दारु पिणाऱ्यांना कॅन्सरसारख्या आजारांचाही सामना करावा लागू शकतो.

रोज एक पेग दारु प्या आणि स्वस्थ राहा असा तत्वज्ञानाचा डोस अनेकजण दुसऱ्यांना पाजत असतात. या माध्यमातून स्वतःच्या दारु पिण्याचं ते एकप्रकारे समर्थन करत असतात. पण अशा लोकांसाठी एक धोक्याची सूचना देणारं संशोधन समोर आलं आहे. रोज एक पेग दारु रिचवणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

टोकिओ विद्यापीठातल्या मासायोशी जित्सु यांनी केलेल्या संशोधनात काही धक्कादायक तथ्यं समोर आली आहेत. १० वर्षांपासून रोज दारु पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरची लक्षणं आढळतात. रोज एक पेग पिणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचीही शक्यता वाढते. रेड वाईन प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी उत्तेजीत होतात. लिव्हर संदर्भात दीर्घकालीन आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थकवा घालवण्यासाठी किंवा तणाव घालवण्यासाठी एक पेग पिण्याचा सल्ला मुळात चुकीचा असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

दारु पिण्याऐवजी चांगल्या आरोग्यासाठी रोज व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

दारु पिण्याचे काही फायदेही असतील पण दारु प्यायल्याने होणाऱ्या तोट्यांची यादी न संपणारी आहे. त्यामुळे दारु पिणं हे कधीही अपायकारकच आहे. एक पेग तत्वज्ञानाचा डोस पाजणाऱ्यांपासून थोडं लांबच राहा.

  

Read More