Health News : गोडाचे पदार्थ समोर आले की अनेकजण तो पदार्थ खायला धाव मारतात. नजरेस भावणारे, जीभेचे चोचले पुरवणारे आणि Mood उत्तम करणारे असेच हे गोड पदार्थ त्यांच्या नावाप्रमाणंच मनस्थितीवरही गोड परिणाम करून जातात. हो, पण प्रत्येकाच्याच आरोग्यावर त्यामुळं सकारात्मक परिणाम होईल असं नाही.
बहुतांश व्यक्तींना जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ खाण्याची सवय असते. अनेकदा तर, गोड नाही खाल्लं तर काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. पण, ही सवय आरोग्यासाठी कामच हितकारक आहे असंही नाही. कारण, गोड पदार्थांच्या अती सेवनाचे दुष्पपरिणामही तितकेच. इतकंच काय तर, गोड खाण्यावर संयम ठेवला नाही, तर आतड्यांचं दीर्घकाळासाठी नुकसान होऊ शकतं आणि यावर उपाय म्हणून तज्ज्ञ मंडळी पाणी पिण्याचा उपाय सुचवतात. चेन्नईतील प्राग्मॅटिक न्यूट्रिशन येथे मुख्य आहारतज्ज्ञ म्हणून सेवेत असणाऱ्या मीनू बालाजी यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचं वृत्त एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहानं प्रसिद्ध केलं.
निरीक्षणानुसार सहसा गोड पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्यानंतर पाणी प्याल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण रोखण्यास मदत होते. या प्रक्रियेत शरीरात जाणारं पाणी लाळ तयार करून गोड पदार्थ सुलभतेने पचनास मदत करतं. पाणीच न प्यायल्यास मात्र रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचा धोका उदभवतो.
जेवणानंतर आणि विशेषत: गोड खाल्ल्यानंतर पाणी पिणं शरीरासाठी अतिशय हितकारक असल्याचा दावा केला जातो. या प्रक्रियेमुळं अन्नाचे उरलेले कण निघून जातात असं तज्ज्ञांचं मत. निरीक्षणानुसार तोंडात असणारे बॅक्टेरिया साखरेवर वाढतात. परिणामी गोड पदार्थांच्या सेवनानंतर पाणी प्यायल्यानं दातांचे विकार दूर राहतात.
गोड पदार्थ खात असताना त्यामध्ये काजू किंवा एक चमचा भाजलेल्या सूर्यफूल, भोपळ्याच्या बिया असल्यास त्या आरोग्यात फायद्याच्या ठरतात. अशा पदार्थांमुळं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची गती तुलनेनं कमी होते. गोड खाण्याची इच्छा होत असल्यास त्यास पर्याय म्हणून पांढऱ्या / रिफाइंड साखरेऐवजी खजूर, केळी, सफरचंद, किंवा गुळाचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.