Jobs In Telecom Sector: चांगल्या पगाराची सरकारी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण टेलिकॉम क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होणार आहे. यातून देशभरातील 10 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. भारत सरकारने राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 2025 (NTP-25) चा मसुदा प्रसिद्ध केलाय. ज्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. भारताला डिजिटल क्षेत्रात जागतिक स्तरावर एक मजबूत आणि स्वावलंबी राष्ट्र बनवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे देशातील डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच आर्थिक विकास, तांत्रिक नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या धोरणांतर्गत 2030 पर्यंत 10 लाख नवीन नोकऱ्या निर्माण करणे आणि दरवर्षी 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
प्रत्येक भारतीय नागरिकाला जलद, सुरक्षित आणि परवडणारी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे हे NTP-25 चे प्रमुख उद्दीष्ट आहे. 90% लोकसंख्येपर्यंत 5G नेटवर्क आणि 10 कोटी घरांपर्यंत फिक्स्ड ब्रॉडबँड सुविधा पोहोचवण्याचे लक्ष्य असून भारतनेट योजनेअंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना फायबर ऑप्टिक नेटवर्कने जोडणे आणि 10 लाख पब्लिक वाय-फाय हॉटस्पॉट्स स्थापन केले जाणार आहेत.सध्या टेलिकॉम क्षेत्राचा भारताच्या जीडीपीमधील वाटा सुमारे 7.8% आहे, जो 2030 पर्यंत 11% पर्यंत वाढवण्याचे NTP-25 चे उद्दिष्ट आहे.NTP-25 अंतर्गत टेलिकॉम उत्पादने आणि सेवांच्या निर्यातीला दुप्पट केली जाणार आहे. ज्यामुळे भारत जागतिक टेलिकॉम बाजारपेठेत एक प्रमुख खेळाडू बनू शकणार आहे.
दरवर्षी 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित करून टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादन (लोकल मॅन्युफॅक्चरिंग) ला 150% वाढवण्याचे लक्ष्य आहे, ज्यामुळे भारत टेलिकॉम उत्पादनांचे जागतिक केंद्र बनणार आहे. 5G, 6G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), क्वांटम कम्युनिकेशन, सॅटेलाइट नेटवर्क आणि ब्लॉकचेन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात भारताला जागतिक स्तरावर टॉप 10 नवोन्मेष केंद्रांपैकी एक बनवणे तसेच 6G तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर 10% आयपीआर (Intellectual Property Rights) हिस्सा मिळवण्याचा टेलिकॉम क्षेत्राचा प्रयत्न असेल.
डिजिटल प्रशासन, स्मार्ट सिटी, इंडस्ट्री 4.0 आणि ग्रामीण ब्रॉडबँड यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीमुळे 10 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. यामुळे अभियंते, तंत्रज्ञ, संशोधक आणि इतर कुशल व्यावसायिकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारताला टेलिकॉम उत्पादनांचे जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी संशोधन, स्टार्टअप्स आणि कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. सेमीकंडक्टर, AI प्रोसेसर आणि प्रगत SoCs (System on Chips) यांच्या निर्मितीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. भविष्यातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 1 लाख लोकांना पुन्हा प्रशिक्षित करणे आणि कौशल्य सुधारणा (स्किल अपग्रेड) केले जाणार आहे. स्टार्टअप्स, शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांना प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणा सुसज्ज असणार आहे.
टेलिकॉम नेटवर्कला क्वांटम आणि क्लासिकल कॉम्प्युटर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. AI-आधारित देखरेख आणि सायबर सुरक्षा उपायांना प्रोत्साहन दिले जात आहे. 6G तंत्रज्ञानाच्या डिझाइन, विकास आणि परिनियोजनात भारताला जागतिक नेता बनवण्याचे उद्दिष्ट असून6G ची गती 1 टेराबिट प्रति सेकंद पर्यंत असेल, जी 5G पेक्षा कित्येक पटीने जलद असणार आहे.
राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 2025 (NTP-25) हे भारताच्या डिजिटल भविष्यासाठी एक परिवर्तनकारी दृष्टिकोन आहे. 5G, 6G, AI, IoT आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या तंत्रज्ञानात आघाडी घेण्याचे उद्दिष्ट ठेवून, हे धोरण भारताला जागतिक टेलिकॉम क्षेत्रात अग्रेसर बनवू शकते. 10 लाख नवीन नोकऱ्या आणि 1 लाख कोटी रुपये वार्षिक गुंतवणुकीच्या लक्ष्यासह, हे धोरण आर्थिक वाढ, तांत्रिक नवोन्मेष आणि सामाजिक सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी सज्ज आहे. या धोरणामुळे भारत केवळ डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्येच नव्हे, तर जागतिक तंत्रज्ञान नेतृत्वातही आपले स्थान मजबूत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.