Heavy Rain Teacher Save Student Lives: उत्तर भारतामधील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. झारखंडलाही या पावसाचा फटका बसला आहे. या पावसात एक निवासी शाळा पूर्णपणे बुडाली. मात्र या शाळेतील शिक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे शाळेतील 162 विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे.
झारखंडमधील जमशेदपूर जवळ एक खासगी निवासी विद्यालय आहे. राज्यात कोसळत असलेला जोरदार पाऊस या शाळेतील 162 विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणार असं वाटत होतं. पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील पांडरसोली येथील 'लव कुश निवासी विद्यालया'मध्ये मुसळधार पावसामुळे शाळेच्या संपूर्ण परिसरात पाणी शिरले. एक मजली इमारतीतीत अडकलेले हे विद्यार्थी पाण्यात अडकून पडले. शिक्षकांनी साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची घाई न करता प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना तातडीने छतावर नेले. त्याच छतावर, अंगावर पाऊस घेत, भयभीत होऊन आणि ओल्या कपड्यांनी कुडकुडत त्यांनी एक संपूर्ण रात्र घालवली. ही इमारतही बुडणार की काय एवढं पाणी या परिसरामध्ये साचलं.
सदर परिस्थितीची माहिती मिळताच रविवारी पहाटे साडेपाच वाजता पोलिस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. रबरी बोटींच्या मदतीने एक एक करून 162 मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान, एनडीआरएफची घटनास्थळी रवाना करण्यात आली होती, मात्र तिच्या पोहोचण्यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांची सुटका झाली होती. शिक्षणांनी छतावरच विद्यार्थ्यांसहीत आसरा घेण्याचा निर्णय घेतल्याने या एका निर्णयामुळे 162 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.
शाळेची एक मजली इमारत पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे आणि पुढील आदेशापर्यंत ही शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. स्थानिक विद्यार्थी घरी रवाना झाले आहेत. इतर जिल्ह्यांतील मुलांना त्यांच्या घरी पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली आहे.
जमशेदपुर के पोटका स्थित एक आवासीय विद्यालय में #तेज_बारिश के कारण स्कूल परिसर जलमग्न हो गया। पानी भरने से 162 बच्चे स्कूल में फंस गए थे। ग्रामीण एसपी ऋषभ गर्ग ने बताया कि #रेस्क्यू_ऑपरेशन चलाकर बच्चों को सुरक्षित बाहर निकाला गया। @Jsr_police #NDRF pic.twitter.com/VKR0zJajk3
— आकाशवाणी समाचार, राँची | Akashvani News, Ranchi (@airnews_ranchi) June 29, 2025
ओडिशाच्या रायरंगपूर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेता पूर्व सिंहभूम आणि सरायकेला-खरसावन जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्व प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी जनतेला सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
ऑरेंज अलर्ट जारी: हवामान खात्याने खुंटी, रांची, रामगड, बोकारो, धनबाद, सरायकेला-खरसावन आणि पश्चिम सिंहभूम जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर 1 जुलै रोजी गुमला, गढवा, पलामू, चतरा, लातेहार आणि लोहारदगा जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे.