Marathi News> भारत
Advertisement

2000 च्या नोटा होणार हद्दपार, 2 वर्षात नोटांची छपाईच नाही

केंद्र सरकार 2 हजारांच्या नोटा हद्दपार करण्याच्या तयारीत

2000 च्या नोटा होणार हद्दपार, 2 वर्षात नोटांची छपाईच नाही

नवी दिल्ली : केंद्र सरकार 2 हजारांच्या (2 thousand note) नोटा हद्दपार करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे. कारण मागच्या 2 वर्षात 2 हजारांच्या नोटा छापण्यात आलेल्या नाहीत.. स्वत:  अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही महत्त्वाची माहिती दिली. नव्या नोटा 2 वर्ष छापल्या जात नसल्या तरी 2 हजारच्या आधी छापलेल्या नोटा अजूनही चलनात असल्याची माहितीही अर्थराज्य मंत्र्यांनी दिली आहे. 2 हजाराच्या नोटा छापण्याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जातो असंही त्यांनी संसदेत सांगितलं. 

देशाच्या चलन प्रणालीमधून हळूहळू दोन हजार रुपयांच्या नोटा काढल्या जात आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांपासून आरबीआयने दोन हजारांच्या नोटा छापण्याचे आदेश दिलेले नाहीत. याचाच परिणाम म्हणून, देशभरात पसरलेल्या एकूण नोटांमधील दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या 3.27 टक्क्यांवरून 2.01 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. लेखी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 30 मार्च 2018 पर्यंत 2000 रुपयांच्या 336.2 कोटी नोटा प्रचलित असून 26 फेब्रुवारी 2021 रोजी तो 249.9 कोटींवर आला आहे.

याआधी दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून कमी करण्याचा प्रयत्न कसा होत आहे हेही आरबीआयने सांगितले होते. 2016-17  मध्ये 2000 रुपयांच्या 354.3 कोटींच्या नोटा छापल्या गेल्या. 2017-18 मध्ये 11.5 कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात केवळ 4.67 कोटीच्या नोट छापल्या गेल्या.

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीच्या वेळी सरकारने देशात प्रचलित जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर 500 ​​आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा आणल्या. नोटाबंदीचे एक कारण म्हणजे सरकारने असे म्हटले होते की, काळ्या पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. अशा परिस्थितीत विरोधकांनी 2000 रुपयांच्या नोटा आणल्याबाबत प्रश्नही उपस्थित केला होता.

आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की एक-दोन वर्षानंतर सरकारने दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचे काम सुरू केले. या दिशेने बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर बँक शाखांमध्ये आलेल्या बर्‍याच नोटा चलनात न ठेवता रिझर्व्ह बँकेत परत पाठविल्या जातात.

Read More