Marathi News> भारत
Advertisement

'मी फार थकलीये, ऑफिसमधील सर्वांनी...', सुसाईड नोट लिहून इंजिनिअर तरुणीने केली आत्महत्या, 'मला बिलं देतात आणि...'

आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.   

'मी फार थकलीये, ऑफिसमधील सर्वांनी...', सुसाईड नोट लिहून इंजिनिअर तरुणीने केली आत्महत्या, 'मला बिलं देतात आणि...'

आसाममध्ये सहाय्यक अभियंत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 30 वर्षीय सहाय्यक अभियंता असणारी तरुणी सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) काम करत होती. मंगळवारी दुपारी ती वास्तव्यास असणाऱ्या भाड्याच्या घरात तिचा मृतदेह आढळला. ज्योतिषा दास असं या तरुणीचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिली ठेवली होती. यामध्ये तिने वरिष्ठ सहकारी आपल्याला 'खोटी बिलं' पास करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. तिने चिठ्ठीत आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव लिहिलं आहे. 

तरुणीने हाताने लिहिलेल्या चिठ्ठीत उल्लेख केला आहे की, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपूर्ण कामासाठी बिले मंजूर करण्यास भाग पाडल्यामुळे आपण तीव्र मानसिक तणावाखाली होतो. "मी कामाचा फार ताण असल्याने हे पाऊल उचलत आहे. आमच्या कार्यालयात माझं मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नाही. मी फार थकली असून, आता कुठेही जाऊ शकत नाही. माझे पालक आता फार चिंतेत आहेत," असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

तरुणीच्या कुटुंबाने औपचारिक पोलीस तक्रार दाखल केली आहे. यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुसाईड नोटच्या आधारे, नुकतंच पदोन्नती झालेले अधीक्षक अभियंता दिनेश मेधी शर्मा, जे पूर्वी बोंगाईगावमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते आणि सध्या बोंगाईगावमध्ये तैनात असलेले उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अमीनुल इस्लाम यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आली असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. "आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. ज्या इमारतीच्या बांधकामांच्या बिलांवरुन हे सर्व झालं आहे त्याची चौकशी केली जाईल. आम्ही नेमका किती खर्च आला याची पुन्हा पाहणी करु," असं त्यांनी सांगितलं आहे. 

सांगलीत कंत्राटदाराची आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील याने गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येतेय. या घटनेवरुन विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना घेरले आहे.

नेमकं प्रकरण काय?

सांगलीतील जलजीवन मिशन योजनेची कामं करणा-या कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलीय. बिलाचे पैसे थकल्याच्या नैराश्यातून हर्षलने जीवन संपवल्याची चर्चा आहे. सरकारकडे कामाचे तब्बल दीड कोटी रुपये थकित असल्याची माहिती आहे.. दरम्यान हर्षलच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप तांदूळवाडी ग्रामस्थांनी केलाय. हर्षल यांच्या आत्महत्येमुळे तांदूळवाडी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सरकारने थकीत बिलाचे पैसे तातडीने द्यावेत तसेच त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत घ्यावं,अशी मागणी तांदूळवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Read More