दिल्लीमध्ये महिन्याभरापूर्वी गटारात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे फक्त महिलेच्या नाकातील पिनच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी महिलेचा पती अनिल कुमार याला अटक केली आहे. अनिल कुमार व्यावसायिक असून, त्यानेच पत्नीची हत्या करुन मृतदेह गटारात फेकल्याचा संशय आहे.
15 मार्च रोजी पोलिसांना गटारात मृतदेह आढळला होता. हा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळलेला होता. तसंच त्याला दगड आणि सिमेंटचं पोतं बांधण्यात आलं होतं. पोलिसांनी नाकातील नथीच्या आधारे महिलेची ओळख पटवली. यामुळे या गुन्ह्याचा उलगडा करण्यात त्यांना मदत मिळाली.
त्या नथीच्या आधारे पोलीस दक्षिण दिल्लीतील एका दागिन्यांच्या दुकानात पोहोचलेय तिथे रेकॉर्ड तपासल्यावर ही नथ गुरुग्राममधील एका फार्महाऊसमध्ये राहणाऱ्या दिल्लीतील प्रॉपर्टी डीलर अनिल कुमारने खरेदी केली असल्याचं समजलं. बिल त्याच्या नावाने जारी करण्यात आलं होतं. महिलेची ओळख पटली असून, तिचं नाव सीमा सिंग आहे. ती 47 वर्षांची होती.
यानंतर पोलीस कुमारच्या घऱी पोहोचले. चौकशी केली असता सीमा सिंग त्याची पत्नी असल्याचं समजलं. पोलिसांनी कुमारकडे सीमाशी बोलायचं आहे अशी विनंती केली असता, त्याने ती फोन न घेता वृंदावनला गेली असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांना संशय आला.
पोलीस कुमारच्या द्वारका येथील कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी डायरीत सासूचा नंबर मिळाला. सासूशी संपर्क साधला असता सीमा सिंग यांची बहिण बबिताने 11 मार्चपासून आपलं तिच्याशी काहीच बोलणं झालं नसल्याचं सांगितलं. सीमा सिंग यांचं कुटुंबही चिंतेत होतं.
बबिताने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा त्यांनी कुमारशी संपर्क साधला तेव्हा त्याने सीमा जयपूरमध्ये असून बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याचं सांगितलं. तिने सांगितले की त्याने त्यांना आश्वासन दिलं होतं की जेव्हा तिला बरं वाटेल तेव्हा तो तिला त्यांच्याशी बोलायला लावेल. हे अनेक दिवस चालू राहिले. सीमा सिंग यांच्या कुटुंबाने सांगितलं की त्यांना पोलिसांकडे जायचं होतं पण कुमारच्या आश्वासनामुळे ते वाट पाहत होते.
1 एप्रिलला कुटुंबाला एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं. यावेळी हा मृतदेह सीमा सिंग यांचाच असल्यावर शिक्तामोर्तब झालं. दुसऱ्या दिवशी, तिच्या मोठ्या मुलानेही तो मृतदेह तिच्या आईचा असल्याचे ओळखलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देऊन कुटुंबाने सांगितलं की, सीमा सिंग यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्यांनी असाही दावा केला की फक्त कुमार आणि सिंग यांच्याकडेच त्यांच्या द्वारकेतील घराच्या चाव्या होत्या. कुमार आणि त्याचा सुरक्षारक्षक शिव शंकर यांना अटक करण्यात आली आहे.