मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर येथून हनिमूनला गेलेलं एक जोडपं 23 मे रोजी मेघालयातून (Meghalaya) बेपत्ता झालं होतं. अखेर 11 दिवसांनी पोलिसांना पतीचा मृतदेह सापडला आहे. चाकूने भोसकून त्याची करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. पत्नी मात्र अद्याप बेपत्ता आहे. राजा रघुवंशी असं पीडित पतीचं नाव आहे. राजा रघुवंशी आपली पत्नी सोनमसह मेघालयला गेला असता, 23 मे रोजी बेपत्ता झाला होता. महिलेचा शोध सध्या सुरु आहे.
पोलीस महिलेचा शोध घेत असताना एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सोनम आणि तिच्या सासूमध्ये संभाषण झाल्याचं ऐकू येत आहे. बेपत्ता होण्याच्या काही तास आधी हे बोलणं झालं होतं.
राजा रघुवंशी आणि सोनम यांनी भाड्याने स्कूटर घेतली होती. या स्कूटरवरून ते मावलाखियात गावात पोहोचले होते.नोंगरियात गावातील प्रसिद्ध जिवंत रूटब्रिजना भेट देण्यासाठी दरीतून 3000 पायऱ्या उतरले होते.
ऑडिओ क्लिपमध्ये सासू सोनमला विचारत आहे की, "मुली कशी आहेस? मी स्वयंपाक करत होते आणि अचानक मला आठवलं की आज तुझा उपवास आहे. तू उपवास ठेवला आहेस ना?". त्यावर सोनम उत्तर देते की, "हो, मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, प्रवास करत असलो तरी मी उपवास मोडणार नाही".
यादरम्यान सासू सोनमला काहीतरी खाण्यास सांगते. सोनम त्यावेळी ट्रेक करत असल्याने सासूला येथे जंगलात काही मिळणार नाही असं सांगते. दोन मिनिटांच्या या फोन कॉलदरम्यान सोनम फार दमलेली असल्याने सासू तिला 'तू धापा टाकत आहेस' अशी विचारणा करते. त्यावर सोनम हा फार कठीण ट्रेक असल्याचं सांगितलं. मी ट्रेक पूर्ण झाल्यानंतर फोन करते असं सांगत ती फोन ठेवते. या ऑडिओ क्लिपची पुष्टी मात्र झालेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे जोडपे 22 मे रोजी मावलाखियाट गावात आले आणि नंतर नोंगरियाटला गेले, जिथे त्यांनी रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी होमस्टे सोडलं आणि 24 मे रोजी त्यांची स्कूटर शिलाँग ते सोहरा, ज्याला चेरापुंजी असंही म्हणतात, रस्त्यालगत असलेल्या एका कॅफेच्या बाहेर आढळली.
29 वर्षीय राजा रघुवंशीचा मृतदेह नोंगरियाट गावापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत आढळला. भावाने उजव्या हातावर 'राजा' असे लिहिलेल्या टॅटूवरून त्याचा मृतदेह ओळखला. पोलिसांनी सांगितलं आहे की, घटनास्थळावरून एका महिलेचा पांढरा शर्ट, औषधाची पट्टी, मोबाईल फोनच्या एलसीडी स्क्रीनचा एक भाग आणि एक स्मार्टवॉच देखील जप्त करण्यात आले आहे.