बंगळुरुत बुधवारी पोलिसांना रेल्वे ब्रीजच्या शेजारी निळ्या रंगाची एक बेवारस बॅग आढळली. ही बॅग थोडीशी फाटलेलीही होती. बेवारस असल्याने पोलिसांना या बॅगची माहिती देण्यात आली. पण जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. महिलेचा हत्या करुन मृतदेह बॅगेत भरला असावा असा पोलिसांना संशय आहे
बंगळुरूच्या बाहेरील जुन्या चांदापुरा रेल्वे पुलाजवळ स्थानिक रहिवाशांना ही सुटकेस सापडली. पोलिसांना ती धावत्या ट्रेनमधून फेकून दिल्याचा संशय आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, "प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे त्यानुसार महिलेची इतरत्र हत्या करण्यात आली आणि नंतर सुटकेसमध्ये भरलेला मृतदेह चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आला. आम्हाला मृतदेहाजवळ कोणतंही ओळखपत्र सापडलेलं नाही. महिलेचं नाव, वय आणि ती कुठून आली याची माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहोत".
बंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस अधीक्षक (बंगळुरू ग्रामीण) सीके बाबा यांनी सांगितलं आहे की, "आम्ही आमचा तपास सुरु केला आहे. सुटकेस धावत्या रेल्वेतून फेकण्यात आली असं तरी प्राथमिकरित्या दिसत आहे. अशी प्रकरणे सामान्यतः रेल्वे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येतात. पण कदाचित ही घटना आमच्या क्षेत्रातील असण्याची शक्यता असल्याने आम्हीही त्यात सामील आहोत. सुटकेसमध्ये फक्त मृतदेह होता. ओळखपत्र किंवा इतर कोणत्या गोष्टी सापडलेल्या नाहीत. मुलगी 18 वर्षांची असल्याचं दिसत आहे. परंतु तिची ओळख अद्याप पटलेली नाही".
मार्चमध्ये अशाच एका प्रकरणात, 32 वर्षीय गौरी अनिल सांबेकरचा मृतदेह बंगळुरूच्या हुलीमावू येथील एका घरात सुटकेसमध्ये भरलेला आढळला होता. तिचा पती राकेश सांबेकर याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. त्याने तिच्या पालकांना फोन करून हत्येची कबुली दिली होती. महाराष्ट्रातील या जोडप्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि ते जानेवारीमध्ये बंगळुरूला स्थायिक झाले होते. राकेश एका आयटी फर्ममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असताना, गौरी नोकरीच्या शोधात होती.