Marathi News> भारत
Advertisement

फक्त 'या' एका कुत्र्याच्या भुंकण्यामुळे गावातील 67 लोकांचा जीव वाचला; मध्यरात्री नेमकं काय घडलं पाहा

हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान मंडीमधील एका गावात कुत्र्याच्या भुंकण्यामुळे 67 लोकांचा जीव वाचला आहे.   

फक्त 'या' एका कुत्र्याच्या भुंकण्यामुळे गावातील 67 लोकांचा जीव वाचला; मध्यरात्री नेमकं काय घडलं पाहा

हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर कायम असून भूस्खलन, पूर आणि ढगफुटी अशा घटना घडत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं असताना, अनेक ठिकाणी लोकांना डोक्यावरील छप्पर गमवावं लागलं आहे. दरम्यान मंडी जिल्ह्यातील एका गावात कुत्र्याने भुंकून धोक्याची घंटा वाजवली आणि 20 कुटुंबातील 67 जणांचा जीव वाचवला. 30 जून रोजी मध्यरात्री ते पहाटे 1 वाजेच्या दरम्यान, मंडीच्या धरमपूर भागातील सियाठी गाव ढिगाऱ्यात अडकलं.

सियाठी येथील रहिवासी नरेंद्र यांनी सांगितलं की, कुत्रा घराच्या दुसऱ्या माळ्यावर झोपला होता. सतत पाऊस पडत असल्याने रात्री अचानक तो जोरजोरात भुंकू लागला आणि मध्यरात्री ओरडू लागला. "त्याच्या भुंकण्याच्या आवाजाने मला जाग आली. मला भिंतीमध्ये मोठी भेग पडल्याचं दिसत. त्यातून पाणी येत होतं. मी कुत्र्यासह खालच्या मजल्यावर धावत गेलो आणि सर्वांना उठवलं".

नरेंद्र यांनी नंतर गावातील इतर ग्रामस्थांनाही जागं केलं आणि सुरक्षित ठिकाणी धाव घेण्याचं आवाहन केलं. पाऊस इतका जोरात होता की, लोक सर्व काही मागे सोडून धावत सुटले. यानंतर काही वेळातच भुस्खलन झालं आणि डझनभरापेक्षा जास्त घरं त्यात गाडली गेली. गावातील फक्त चार ते पाच घरं आता दिसत आहेत. इतर सर्व घरं आता भुस्खलनाच्या मलब्याखाली आहेत. 

बचावलेले लोक गेल्या सात दिवसांपासून त्र्यंबळा गावात बांधलेल्या नैना देवी मंदिरात आश्रय घेत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमुळे अनेक गावकरी रक्तदाब आणि नैराश्याने ग्रस्त आहेत. या दुर्घटनेनंतर, इतर गावातील लोकांनी मदतीचा हात पुढे केला असून सरकार 10 हजार रुपये मदत म्हणून देत आहे.

हिमाचल प्रदेशात 20 जूनपासून पावसाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 50 जणांचा मृत्यू भूस्खलन, पूर आणि ढगफुटीसारख्या पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला आहे, तर 28 जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) सांगितलं आहे.

मुसळधार पावसामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 23 पूर, त्यानंतर 19 ढगफुटी आणि 16 भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलनाचा गंभीर परिणाम झालेल्या मंडी जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे मंडीतील 156 रस्त्यांसह 280 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी 10 जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशारा जारी केला आहे.

Read More