Marathi News> भारत
Advertisement

गेलेली वीज, बंद पडलेली लिफ्ट, आत अडकलेला मुलगा अन् धावपळ; फेल झालेल्या यंत्रणेने घेतला बापाचा जीव

इमारतीमधील वीज काही मिनिटांनी पूर्ववत झाली होती, आणि मुलगा सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर आला होता.   

गेलेली वीज, बंद पडलेली लिफ्ट, आत अडकलेला मुलगा अन् धावपळ; फेल झालेल्या यंत्रणेने घेतला बापाचा जीव

आपल्या जवळची व्यक्ती संकटात असली की अनेकदा त्याला वाचवण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावतो. अशावेळी भावना वरचढ ठरतात आणि आपला ताबा घेतात. पण परिस्थिती अशी असते की, या भावना आपल्या जीवाला धोका निर्माम करु शकतात याची जाणीव होत नाही. भोपाळच्या रॉयल फार्म विला कॉलनीमध्ये अशीच घटना घडली आहे. फ्लॅट क्रमांक 307 मध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर भटनागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

रात्रीचे 10 वाजले होते अन् जोराचे वारे वाहत होते. त्याचवेळी परिसरात अंधार झाला होता. रॉयल फार्म विला कॉलनीतील घरात असणाऱ्या 51 वर्षीय ऋषीराज भटनागर यांनी 8 वर्षाच्या मुलाला लिफ्टने घरी येण्यास सांगितलं. पण वीज गेल्याने लिफ्ट बंद पडली आणि मुलगा आत अडकला. मुलगा आतून 'बाबा, बाबा' ओरडत होता. अंधार झाल्याने शांत असलेल्या इमारतीत हा आवाज घुमत होता. 

मुलगा लिफ्टमध्ये अडकला असल्याने ऋषीराज भटनागर घाबरले होते. जनरेटर रुमच्या दिशेने त्यांची धावपळ सुरु होती. लाईट पुन्हा यावी यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत होते. तीन मिनिटात वीज पुन्हा आली आणि देवांश सुरक्षित बाहेर आला. पण दुसरीकडे ऋषीराज भटनागर खाली कोसळले होते. 

त्यांनी सीपीआर देण्यात आला, पण काही फायदा झाला नाही. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात आणलं असता मृत घोषित केलं. बाप असल्याने आलेला ताण आणि मनावरील ओझं त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं होतं. 

त्याच सकाळी, पत्नी पारुलने वट सावित्री व्रत पाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी पवित्र वडाच्या झाडाखाली प्रार्थना केली होती. पण रात्रीपर्यंत तो पती या जगातून गेला होता. फक्त तीन महिन्यांत दुसऱ्यांदा हृदयविकाराच्या झटक्याने कुटुंबाचा एक आधारस्तंभ हिरावून घेतला. ऋषिराज यांच्या वडिलांचेही संध्याकाळचा चहा घेताना निधन झालं होतं. 

ऋषिराज केवळ कुटुंबप्रमुख नव्हते. ते एक प्रॉपर्टी डीलर आणि विमा सल्लागार होते. कॉलनीच्या देखभाल आणि दैनंदिन कामकाजातही ते सहभागी असायचे. तक्रार न करता जबाबदारी स्वीकारण्यासाठी ओळखला जाणारे आणि ज्याच्यावर अवलंबून राहता येईल अशी त्यांची ओळख होती. "तो वर-खाली धावत होता, जनरेटर सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या बहिणीने त्याला सीपीआर दिला, पण खूप उशीर झाला होता," असं शेजारी आणि साक्षीदार विवेक सिंग म्हणाले. "जनरेटर बॅकअपमध्ये विलंब झाला. भीती प्रचंड होती. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात नेले तरी त्याला वाचवता आले नाही," असं सोसायटीचे दुसरे सदस्य ब्रिज सक्सेना म्हणाले.

"प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता आणि वडील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नादरम्यान ते कोसळले. आम्ही प्रत्येक बाजूने चौकशी करत आहोत," असं मिसरोड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनीष राज भदोरिया म्हणाले.

एकेकाळी लिफ्टची भीती वाटणाऱ्या देवांशच्या मनात मात्र आता एक खोल जखम आहे, जी कधीही जाणार नाही. एका व्यक्तीचा कोणताही आजार किंवा युद्धात नव्हे तर अयशस्वी बॅकअप आणि वडिलांच्या निःशर्त प्रेमात जीव गमावला हे समाजाने विसरता कामा नये.

Read More