बापाने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं जबरदस्ती 29 वर्षाच्या तरुणाशी लग्न लावल्याची धक्कादायत घटना समोर आली आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी परत आपल्या माहेरी आली असता तिच्या नवऱ्याने तिला जबरदस्ती उचलून नेलं. यावेळी बापासह सर्व नातेवाईक फक्त पाहत उभे होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
होसूरजवळील थोट्टामंजू टेकडी गावातील मुलीने 7 वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. ती आपल्या कुटुंबासह आपल्या घरी राहत होती. 3 मार्चला तिचं लग्न शेजारच्या डोंगरी गावातील कालीकुट्टई येथील 29 वर्षीय मजूर मधेशशी झालं होतं. परिस्थिती आणखी त्रासदायक बनवणारी गोष्ट म्हणजे तिची आई नगाम्माने (29) विवाह सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विवाहसोहळा पार पडल्यानंतर मुलगी थिम्मत्तूर येथील आपल्या घरी परतली. तिने आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना आपल्याला मदेशशी लग्न करायचं नाही सांगत त्याच्या घरी जाण्यास नकार दिला. मात्र तिचा पती मदेश आपला भाऊ मल्लेशसह तिथे पोहोचला. त्याने रडणाऱ्या मुलीला उचललं आणि तिच्या इच्छेविरोधात फरफटत नेलं.
यादरम्यान तिथे उपस्थित लोकांनी ही धक्कादायक घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
यानंतर महिला पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी तपास सुरु केला. मुलीच्या आजोबांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मदेश, मल्लेश आणि नगमा यांना जबरदस्ती लग्न केल्याप्रकरणी अटक केली.