बिहारमध्ये होम गार्डची परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शारिरीक चाचणीदरम्यान बेशुद्ध पडल्याने तरुणीला रुग्णालयात नेलं जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या रुग्णवाहिकेत तिच्यावर बलात्कार करत माणुसकीला काळीमा फासण्यात आला आहे. बिहारच्या गया जिल्ह्यात ही घटना घडली असून, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
24 जुलै रोजी बोधगया येथील बिहार मिलिटरी पोलिस मैदानावर सुरू असलेल्या होमगार्ड भरती सरावादरम्यान हा कथित बलात्कार झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भरतीसाठी प्रक्रियेचा एक भाग असलेल्या शारीरिक चाचणी दरम्यान तरुणी बेशुद्ध पडली होती. यानंतर तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. तरुणीने आपण बेशुद्धावस्थेत असताना अनेकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे बोधगया पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाठवण्यात आलं आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर काही तासातच एसआयटीने रुग्णवाहिकेचा चालक विनय कुमार, तंत्रज्ञ अजित कुमार या दोन संशयितांना अटक केली आहे. दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सीसीटीव्हींच्या आधारे रुग्णवाहिकेच्या मार्गाची आणि वेळेची माहिती मिळवण्यात मदत झाली.
पोलीस तक्रारीतील माहितीनुसार, तरुणीने सांगितलं आहे की, मैदानात शारिरीक चाचणी सुरु असताना तिची शुद्ध हरपली. प्रवासात असताना आपल्याला लैंगिक अत्याचार होत असल्याचं लक्षात आलं. यानंतर तिने पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाला याची माहिती देत, तीन ते चार जणांनी बलात्कार केल्याचं सांगितलं.
या घटनेवर लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) खासदार चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली असून बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर टीका केली आहे. तसंच राज्य पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.