मेरठमधील हत्याकांडानंतर अनेक पतींनी आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा धसका घेतला आहे. ग्वालियरमधील एका पतीलाही आपली हत्या होऊ शकते अशी भीती सतावत आहे. अमित कुमार सेन नावाच्या एका तरुणाने आपल्या पत्नीचे एकापेक्षा जास्त प्रियकर असून त्यातील एकासह लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचा आरोप केला आहे. आपण याचा विरोध केला असता, पत्नीच्या प्रियकराने जीवे मारण्याची धमकी दिली असाही त्याचा आरोप आहे.
ग्वालियरचा मेहंदीवाला सैय्यद परिसरात राहणाऱ्या अमित सेनच्या पत्नीचे लग्नानंतरही अनेक प्रियकर होते. सध्या ती राहुल बाथम नावाच्या एका तरुणासह लिव्ह-इनमध्ये राहत आहे. ती आपल्या लहान मुलालाही सोबत घेऊन गेली आहे. अमितचा आरोप आहे की, पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून मोठा मुलगा हर्षची हत्या केली.
अमितने अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली, पण कोणतीच कारवाई कऱण्यात आली नाही. अखेर त्रासलेल्या अमितने फुलबाग चौकात मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या पोस्टरखाली धरणं आंदोलन सुरु केलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा देण्यासाठी आवाहन केलं असून, लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जर तात्काळ कारवाई केली नाही, तर मेरठमधील ड्रम कांडप्रमाणे माझी हत्या होऊ शकते अशी भीतीही त्याने व्यक्त केली आहे.
याप्रकरणी जानकगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितलं आहे की, अमित पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आला नव्हता. पोलिसांनी सांगितलं आहे की, जर त्याने काही तक्रारअर्ज दिला असेल तर कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे पोलिसांकडे मी मदत मागितली मात्र काही फायदा झाला नाही असं अमितचं म्हणणं आहे.