केरळमध्ये बुधवारी संध्याकाळी त्रिशूरच्या पडीयूर गावात दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली. येथे एका 74 वर्षीय महिलेची आणि तिच्या 43 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. भाड्याच्या घरात त्यांचे कुजलेले मृतदेह आढळल्यानंतर एकच गदारोळ उठला होता. मृतांची ओळख पटली आही. करलम वेल्लानीची रहिवासी असलेली मणी आणि तिची मुलगी रेखा अशी त्यांची नावं आहेत. घरातून दुर्गंधी येत असलेल्या शेजाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर हे मृत्यू उघडकीस आले. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
शेजाऱ्यांनी मणी यांची मोठी मुलगी सिंधूला फोन करुन घरातून दुर्गंधीचा वास येत असल्याचं सांगितलं. ती इरिंजलाकुडा बॉईज स्कूलमध्ये काम करते. घरी पोहोचताच, सिंधूने मागच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केला. आत गेल्यानंतर राहिलं असता घरात सगळं अस्तव्यस्त होतं. तसंच दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर तिने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासणीत दोघींचू गळा दाबून हत्या केली असावी असा अंदाज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
48 वर्षीय रेखाचा पती प्रेमकुमार प्राथमिक संशयित आहे. तो मूळचा कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी आहे. रेखाशी दुसरं लग्न करणाऱ्या प्रेमकुमारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 2019 मध्ये उदयमपेरूर येथे झालेल्या त्याच्या पहिल्या पत्नी विद्याच्या हत्येप्रकरणी तो सध्या जामिनावर आहे. त्या प्रकरणात, त्याच्यावर तिची हत्या करून मृतदेह जंगली भागात फेकल्याचा आरोप होता.
गुन्ह्याच्या ठिकाणी प्रेमकुमारची हस्तलिखित चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे, ज्यामध्ये धमक्यांचा समावेश आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. चिठ्ठीतील मजकूर सार्वजनिक करण्यात आलेला नाही, परंतु पोलिस सूत्रांनी त्यात शत्रुत्वाची भाषा असल्याचं म्हटलं आहे.
मृत्यूच्या काही दिवस आधी, रेखाने प्रेमकुमारविरुद्ध घरगुती हिंसाचाराची औपचारिक पोलिस तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सोमवारी दोघांना समुदेशनासाठी बोलावलं होतं.