Marathi News> भारत
Advertisement

पत्नीची हत्या केल्यानंतर तुकडे केले, नंतर प्रेशर कुकरमध्ये टाकून तीन दिवस....; पोलीसही चक्रावले

Hyderabad Murder: हैदराबादमध्ये एका पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन नंतर ते प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले. यानंतर त्याने ते एका तळ्यात टाकून दिले अशी कबुली दिली आहे.   

पत्नीची हत्या केल्यानंतर तुकडे केले, नंतर प्रेशर कुकरमध्ये टाकून तीन दिवस....; पोलीसही चक्रावले

Hyderabad Murder: हैदराबादमध्ये एका पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची निर्घृण घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर गुन्हा लपवण्याच्या हेतूने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन नंतर ते प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले. गुरु मूर्ती असं 45 वर्षीय आरोपीचं नाव असून, तो माजी सैनिक आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) सुरक्षा रक्षक असणाऱ्या आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र अद्याप हे सविस्तरपणे समोर येऊ शकलेलं नाही. 

35 वर्षीय वेंकट माधवी आपल्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. 16 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला तेव्हा त्यांना पतीवर संशय आला. चौकशी करण्यात आली असता त्याने या भयानक हत्येची कबुली दिली. 

पोलीस निरीक्षक नागराजू यांनी सांगितलं आहे की, "कुटुंबीयांनी आमच्याकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यासह पतीदेखील पोलीस ठाण्यात आला होता. आम्हाला त्याच्यावर संशय आल्याने चौकशी केली. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली".

गुरु मूर्ती याने पोलिसांकडे कबुली देताना सांगितलं की, त्याने बाथरुममध्ये पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर प्रेशर कुकरमध्ये शिजवले. यावेळी त्याने त्यातील हाडं वेगळी काढली. ही हाडं त्याने बारीक केली आणि पुन्हा नंतर शिजवली. सलग तीन दिवस मांस आणि हाडं शिजवल्यानंतर त्याने ते सर्व एका बॅगेत भरलं आणि तलावात फेकून दिलं. पोलीस आरोपीने दिलेल्या माहितीची पडताळणी करत सत्यता तपासत आहेत. 

या दांपत्याला दोन मुलं आहेत, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघांमध्ये सतत भांडण होत असे. पण ही हत्या का केली, त्यामागील हेतू काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

Read More