Viral Video: उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमधील बबुरी गावात बिबट्याने विटभट्टीवर काम करणाऱ्या एका मजुरावर हल्ला केला. मजुराने यावेळी थेट बिबट्याशी लढा दिला आणि जीव वाचवला. त्यांच्यात झालेल्या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. यामध्ये मजुराचा हात बिबट्याच्या तोंडात असतानाही रक्तबंबाळ अवस्थेत तो भिडताना दिसत आहे.
मजूर बिबट्याशी लढत राहिला आणि अखेरीस आपला जीव वाचवला. मिहिलाला गौतम असं या मजुराचं नाव आहे. व्हिडीओत दिसत आहे की, बिबट्याने मजुरावर झेप घेतली आहे. दोघेही जमिनीवर पडलेले असून, मजूर त्याच्यापासून सुटका करण्यासाठी संघर्ष करत आहे. यादरम्यान तिथे लोकांची तुफान गर्दी झाली असून, मजुराला मदत करण्याच्या हेतूने बिबट्याच्या अंगावर विटा फेकताना दिसत आहे. काही वेळाने मजुर त्याच्यापासून सुटका करुन चालत जाताना दिसत आहे. बिबट्याही त्याच्या मागून जातो. मिळालेल्या माहितीनुसार, मजुराचा जीव वाचला आहे.
वीडियो यहां देख सकते हैं pic.twitter.com/mIrltIJQWy
— Ansar Imran SR (@ansarimransr) June 24, 2025
मंगळवारी लखीमपूर-खेरी उत्तर खेरी वनक्षेत्र धौरहरा परिसरात दोन बिबट्यांनी उच्छाद मांडला. त्यांच्य़ा हल्ल्यात एक वन कर्मचारी, एक पीआरव्ही कॉन्स्टेबल आणि दोन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एका वीटभट्टीवर बिबट्या आणि एका तरुणामध्ये झालेल्या दीर्घ संघर्षादरम्यान शेकडो लोक विटा आणि दगड फेकत राहिले आणि बघ्याची भूमिका बजावत राहिले. पण बिबट्याला पकडून वन विभागाच्या स्वाधीन करण्याचं धाडस कोणीही दाखवलं नाही.
मंगळवारी धौरहरा रेंज परिसरातील जेठपुरवा गावाजवळ एक बिबट्या दिसला. यानंतर ग्रामस्थांची गर्दी केली होती. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारीही तिथे पोहोचले. बिबट्या खूप थकलेला आणि आजारी दिसत होता. त्यामुळे त्याला जाळीत पकडण्यात आलं आणि वन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आलं.
दरम्यान, रेंजच्या शेजारील गावातील बाबूरीमध्ये, दुसरा बिबट्या शेतातून बाहेर आला आणि एका वीटभट्टीवर पोहोचला. तिथे बिबट्याची जुगानुपूर गावातील रहिवासी मिहिलालशी झुंज झाली, जो भट्टीवर मजूर म्हणून काम करत होता. बिबट्या आणि मिहिलालमधील संघर्ष पाहण्यासाठी शेकडो लोक भट्टीवर पोहोचले होते. अखेरी वन विभागाने मोठ्या प्रयत्नाने बिबट्याला बेशुद्ध केलं आणि ताब्यात घेतलं.